पुणे, – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक १९ जुलै २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी ही स्पर्धा नवव्या वर्षात पदार्पण करत असून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील एकूण ७ वेगवेगळ्या गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्रमुख गट:
- पुणे ते बारामती – राष्ट्रीय स्तर (पुरुष) – 122 कि.मी.
- पुणे ते बारामती – राज्य स्तर (पुरुष) – 122 कि.मी.
- सासवड ते बारामती – MTB सायकल खुली स्पर्धा (85 कि.मी.)
- माळेगाव ते बारामती – महिला गट (राष्ट्रीय) – 15 कि.मी.
- पोलीस/राज्य कर्मचारी सासवड ते बारामती – 85 कि.मी.
- महिला पोलीस/कर्मचारी माळेगाव ते बारामती – 15 कि.मी.
या स्पर्धेत देशभरातील नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४०० ते ४५० सायकलपटू सहभागी होणार असून राज्यस्तरीय गटात सुमारे ३०० ते ३५० स्पर्धकांचा सहभाग आहे. दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, तामिळनाडूसह विविध राज्यांतील आणि रेल्वे, सैन्य, एअरफोर्समधील नामवंत सायकलपटू सहभागी होत आहेत.

प्रसिद्ध सहभागी सायकलपटूंमध्ये:
कृष्णा नायकोडी, मंजीत सिंग (एअरफोर्स), दिपिका फडतारे, ज्योती राठोड, संतोष पुजारी, कोरप्पा कुक्कडी, स्नेहल माळी, मनाली रानोजी यांचा समावेश आहे.
६ लाख रुपयांची रोख बक्षिसे व “घाटाचा राजा” पुरस्कार
प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे (एकूण ६ लाख रुपये), स्मृतिचिन्हे आणि “दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या सायकलपटूस” ‘घाटाचा राजा’ किताब दिला जाणार आहे.
प्रारंभिक रॅली: शनिवारवाडा ते हडपसर – ३००० हून अधिक सहभागी
सायकल स्पर्धेपूर्वी शनिवारवाडा ते हडपसर या मार्गावर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली आरोग्य, पर्यावरण, वाहतूक व स्वच्छतेबाबत जनजागृती करणार आहे. या रॅलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, जेष्ठ नागरिक, समाजसेवक असे ३००० ते ३५०० जण सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन: शनिवारवाडा व हडपसर येथे
शनिवारी सकाळी ८ वाजता शनिवारवाडा, पुणे येथे उद्घाटन समारंभ महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री मा. चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत होणार आहे.
हडपसर येथील मुख्य स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता उद्योजक मा. सतिश मगर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव यांच्या हस्ते होईल.
मुख्य स्पर्धेचा मार्ग:
हडपसर – वडकीनाला – दिवे घाट – सासवड – जेजुरी – वाल्हे – निरा – सोमेश्वरनगर – कोऱ्हाळे – पणदरे – माळेगाव – बारामती (विद्या प्रतिष्ठान)
MTB व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन सासवड येथे सकाळी १०.१५ वा. होणार आहे.
बक्षिस समारंभ: ग.दि.मा. सभागृह, बारामती
बक्षीस वितरण समारंभ दुपारी २.३० वाजता मंत्री मा. मकरंद पाटील, मा. दत्तात्रय भरणे, खा. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील संस्थेची वाटचाल
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ १६३ शाखांद्वारे ९०,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देत असून शैक्षणिक गुणवत्तेत व क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर आहे. सन २०१२ पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर ७०, राष्ट्रीय स्तरावर ४४४, राज्यस्तरावर ७३६ अशा १२५० खेळाडूंची निवड झाली आहे. संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सुवर्ण पदके मिळवली असून शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही पटकावले आहेत.
सामाजिक उपक्रम व पर्यावरण जपणारे उपक्रम
संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन, तसेच उत्तरपत्रिकांमधील कोऱ्या कागदांपासून तयार केलेल्या वह्यांचे वितरण असे उपक्रम नियमित राबवले जात आहेत.