पिंपरी चिंचवड- : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप 2025‘ या स्पर्धे आज तिसऱ्या दिवशी भारतीय बाल गिर्यारोहकांचा जलवा पाहायला मिळाला. भारताने तब्बल सहा पदकांची कमाई करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या दमदार कामगिरीद्वारे भारताने आशियातील बाल गिर्यारोहण क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, पिंपरी चिंचवड शहराने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी एक नवे केंद्र म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.

या स्पर्धेत भारताच्या आकाश सोरेन या खेळाडूने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने 13 वर्षा खालील मुलांच्या वेग (Speed) गटात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने केवळ 8.368 सेकंदात शिखर गाठत सर्वांना चकित केले. त्याच गटातील शंकर सिंह कुंतिया याने 8.574 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. तर मोरा बुरीउली याने कांस्यपदक पटकावले. बौल्डरिंग (Bouldering) प्रकारात कोरियाच्या लिम सिह्युन आणि जूनह्योक को यांनी वर्चस्व राखले, तर भारताच्या शंकर सिंह कुंतिया याने दुसरे स्थान पटकावले.
भारताची ध्रुवी गणेश पाडवाल हिने तेरा वर्षा खालील मुलींच्या गटात चमकदार कामगिरी करत स्पीड (Speed) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत तिने केवळ 10.379 सेकंदात शिखर गाठले. याच गटात मनीषा हंसदा हिने 11. 478 सेंकद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. तर हाँग काँगच्या मॅन नोई लॅम हिने कांस्यपदक आपल्या नावावर केले. बौल्डरिंग (Bouldering) प्रकारात कोरियाच्या किम हेउन आणि रोआ ली यांनी पहिले दोन क्रमांक मिळवले, तर इराणच्या एलीना सामी आणि भारताच्या ध्रुवी पाडवाल यांनी पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता आले.
लीड (Lead) प्रकारातील 15 वर्षा खालील गटात कोरिया आणि जपानमधील खेळाडूंमध्ये तुफान स्पर्धा पाहायला मिळाली. मुलांच्या लीड प्रकारात कोरियाचा जुंगयुन चोई विजेता ठरला, तर जपानचा इट्सुकी नागाओ दुसऱ्या क्रमांकावर आला. मुलींच्या लीड प्रकारात कोरियाच्या हाबीन किम हिने सुवर्णपदक पटकावत वर्चस्व राखले, तर कोरियाच्याच नो युन सिओ हिने रौप्यपदक मिळवले आणि जपानच्या सुमिरे हिरोसे हिला कांस्यपदक मिळाले. भारताच्या वेद चव्हाण आणि अर्शिया बनू पीरसबनावर यांनीही चांगली झुंज दिली.
रात्री उशिरा पार पडलेल्या पदक वितरण समारंभात दोनदा भारताचे राष्ट्रगीत वाजवले गेले. अन् त्यासह उपस्थितांची मान अभिमानाने उंचावली गेली. तर भावना दाटून आल्याने डोळे नकळत पाणावले गेले. यामागे चुरशीने चढाई कारणाने खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि आयोजक यांची मेहनत आहे. या सहा पदकांसह भारतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण क्षेत्रात आपली वाढती क्षमता दाखवली आहे. तसेच यामुळे MSCA च्या मिशन ऑलिंपिक्स कार्यक्रमाला या स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळाली आहे.


