पिंपळे सौदागर – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अत्याधुनिक योगा पार्कमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी क्लायम्बिंग वॉल उभारण्यात आली आहे. याच ठिकाणी २९ वी आयएमएफ फाऊंडेशन पश्चिम विभाग अंतर्गत राष्ट्रीय अजिंक्यपद क्लायम्बिंग स्पर्धा २०२५ चे उद्घाटन मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या स्पर्धेत पश्चिम विभागातील सुमारे १५० प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. योगा पार्कमधील क्लायम्बिंग वॉलमध्ये तीन प्रमुख प्रकारांचा समावेश आहे – १८ मीटर उंचीची बोल्डरिंग वॉल, २१ मीटर उंचीची स्पीड वॉल, आणि २१ मीटर उंचीची लीड वॉल. ही वॉल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची असून येथे सराव करणारे खेळाडू भविष्यात नॅशनल व इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

योगा पार्कमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्यांची सुविधा, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे.
उद्घाटन समारंभ प्रसंगी माजी नगरसेविका निर्मलाताई कुटे, आयएमएफ फाउंडेशनचे चेअरमन के. सरस्वती, सेक्रेटरी श्रीकृष्ण कडुस्कर, सदस्य सुरेंद्र शेळके, निवृत्त डीजीपी ॲड. नरेंद्र निकम, निवृत्त लष्कर अधिकारी देवांग नायक आणि इतर अनेक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे पुण्यातील खेळाडूंना नवसंजीवनी मिळणार असून, शहराचा राष्ट्रीय पातळीवरचा ठसा अधिक गडद होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.