आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक महिला क्रिकेट स्पर्धा
पुणे : गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर अदिती पंचपोरच्या नाबाद २५ धावांच्या जोरावर कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने आंतरसहकारी बँक ‘सहकार करंडक महिला क्रिकेट स्पर्धेत राजगुरूनगर बँक संघावर सात फलंदाज राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांतील महिलांसाठी आयोजित ही स्पर्धा बिबवेवाडीच्या यशवंत टर्फ सरसेनापती हैबतराव शिळीमकर विद्यालय येथे झाली. या एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत कॉसमॉस बँक संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा केला. त्यामुळे राजगुरूनगर बँकेला ६ षटकांत ३ बाद ३६ धावाच करता आल्या. कॉसमॉस बँक संघाने विजयी लक्ष्य २.४ षटकांतच पूर्ण केले.

विजेत्यांना असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते, संचालक बाळासाहेब तिखे, अनिल गाडवे, मोहम्मद गौस, राजेश कवडे, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, असोसिएशन चे प्रशिक्षण विभागाचे समन्वयक जितेंद्र पायगुडे, वंदना काळभोर, अजय रजपूत, दिपक घाडगे, सिमा घाडगे, ऋषिकेश शिवले आणि कॉसमॉस बँक, राजगुरुनगर बँक आणि इतर बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू डिंपल साळुंखे, सर्वोत्तम गोलंदाज अस्मिता दौंडकर,
सर्वोत्तम फलंदाज किताब अदिती पंचपोर ठरली
स्पर्धेत सन्मित्र बँक, पुणे अर्बन बँक, पुणे पीपल्स बँक, साधना बँक, विश्वेश्वर बँक, जिजामाता महिला बँक या बँकेने सहभाग घेतला होता.
संक्षिप्त धावफलक : अंतिम फेरी – राजगुरूनगर – ६ षटकांत ३ बाद ३६ (माधुरी देवतारसे १९, चैताली पाटोळे ७, श्रद्धा १-५) पराभूत वि. कॉसमॉस बँक – २.४ षटकांत बिनबाद ३७ (अदिती पंचपोर नाबाद २५, डिंपल साळुंखे नाबाद ९).


