सांगली: आटपाडी तालुक्यामधील एका ओढ्यात चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयच्या नोटा वाहून आल्या. या नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आटपाटी शहरातील गदीमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. शनिवारी सकाळपासून या ओढ्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा वाहून येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी एकच गडबड उडाली आहे. या ठिकाणी बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती.
शनिवारी आटपाटीचा आठवडे बाजार असल्याने परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शहरात येतात. यावेळीच ओढ्यामध्ये नोटा सापडत असल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यानंतर या नोटा गोळा करण्यासाठी एकच धांदल उडाली. परिसरातील तरुण, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनीही ओढ्यामध्ये उतरत नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. या वेळी एका तरुणाला तब्बल दहा हजार रुपयांच्या नोटा सापडल्या.