पुणे : “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरक आणि मार्गदर्शक आहे. समतेचे बीज पेरणारे पहिले राजा म्हणजे शिवछत्रपती. त्यांनी अन्याय-अत्याचाराविरुद्ध संघर्ष छेडला आणि नव्या पिढीला प्रेरणा दिली. जगाच्या इतिहासात इंग्लंडमध्ये शौर्य शिकवले जाते, पण छत्रपतींनी साडेतीनशेहून अधिक किल्ल्यांची उभारणी करून स्वतःचे शौर्य जिवंत केले. आज महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या वारसा यादीत झाला आहे. त्या किल्ल्यांचे चित्रण कलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून जिवंत केले आहे,” असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये निवेदिता प्रतिष्ठान व आकृती ग्रुपतर्फे आयोजित पेंटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी बालगंधर्व कलादालन येथे बोलत होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा’ हा विषय प्रदर्शन व स्पर्धेसाठी देण्यात आला होता.
या स्पर्धेत पुण्यातील कलाकार शारदा दास यांनी पहिले पारितोषिक मिळवले, तर दुसरे पारितोषिक रत्नागिरीचे विक्रम परांजपे आणि तिसरे पारितोषिक पुण्यातील रिता यांना मिळाले. स्पर्धेत एकूण ३८ कलाकारांनी सहभाग घेतला होता. कलाकारांनी किल्ल्यांचे वास्तवदर्शी चित्रण करून उपस्थितांची दाद मिळवली.
स्पर्धेचे परीक्षण चिंतामणी असिफनास आणि मिलिंद भांजी यांनी केले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई आणि ज्येष्ठ चित्रकार मुरलीधर लाहोटी यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. समन्वयक अॅड. अनुराधा भारती याप्रसंगी उपस्थित होत्या.
डॉ. सबनीस म्हणाले, “छत्रपतींच्या किल्ल्यांची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. भारताला प्रेरणा देण्याचे काम महाराजांनी केले आहे. पेंटिंग ही संवेदनांची भाषा आहे, सौंदर्य व्यक्त करण्याची कला आहे. या फेस्टिव्हलमधून कलेचा योग्य सन्मान झाला आहे. कलाकार हा समाजाचा नायक आहे,” असे ते म्हणाले.
स्पर्धेत डॉ. शांती पोतदार, गौरव पातंबेकर आणि हेमंत चिंचवल यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. अभय छाजेड यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. श्रुती दातार यांनी केले. सचिन आडेकर आणि आबा जगताप यांनी व्यवस्थापन पहिले. हे विनामूल्य प्रदर्शन दि. ३ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य खुले असेल.