पंढरपूर तालुक्यातील छोट्याशा धोंडेवाडी गावात, एका आजीच्या पडक्या घरातून वाहणारा पाऊस, तिच्या डोळ्यातील अश्रूंसोबत मिसळला होता… आणि हाच क्षण ठरला नृत्यांगना सायली पाटीलच्या संवेदनशीलतेचा प्रेरणास्रोत!
एका निराधार, वयोवृद्ध आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता — घर कोसळण्याच्या स्थितीत, ओलसर भिंती, चिखलाने भरलेला संसार आणि मदतीसाठी कुणाचंही नाव नाही. हा व्हिडिओ पाहताच नृत्यांगना सायली पाटीलच्या मनाचा ठाव गेला. “आपण जेवढं मंचावर नाचतो, तेवढंच जर एखाद्याच्या आयुष्यात हसू आणलं, तर तेच खरं नृत्य!” — असं म्हणत सायली थेट धोंडेवाडीत पोहोचली.
तिने केवळ सहानुभूती दाखवली नाही, तर कृती केली. स्वतःच्या पैशातून त्या आजीचं घर नव्यानं उभारलं — नवीन पत्रे, घरातील साहित्य, भांडीकुंडी, धान्य, आणि जगण्यासाठी लागणारं सगळं काही. आजीला नवी साडी दिली, आणि तिच्याच हातून नवीन घराचं रिबीन कापून घेतलं. त्या क्षणी रडणाऱ्या चेहऱ्यावर उमटलं हास्य म्हणजे जणू “विठ्ठल भेटल्याचा” क्षण होता, असं सायली पाटील हसून सांगते.
सायली म्हणते, “दोन दिवसांपूर्वी मी तिचे अश्रू पाहिले, आणि आज तिच्या डोळ्यांत आनंद पाहिला — हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार आहे.
ही घटना सांगते की, समाज अजून जिवंत आहे… अजूनही कुणाच्या हाकेला संवेदनशील हृदयं प्रतिसाद देतात. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या हेमांगी पाटीलप्रमाणेच, सायली पाटीलनेही दाखवून दिलं — कलाकार केवळ रंगमंचावर नाही, तर माणुसकीच्या वाटेवरही तेज पेरतो.