पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्वच्छता मोहीम, आर.आर.आर सेंटर, शून्य कचरा प्रकल्प, वेस्ट टू वंडर, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक जीवन शैलीचा स्वीकार, जनजागृती असे अनेक अभिनव प्रयोग राबविले जात आहेत.

महापालिकेचा आरोग्य विभाग शहराच्या सौंदर्यात भर घालणारे उपक्रम सातत्याने राबवत आहे. त्यानुषंगाने अ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक १० अंतर्गत इंदिरानगर, नाना-नानी पार्क, मोरवाडी, म्हाडा कॉलनी, शिवनेरी सोसायटी, अजिंठानगर, सुमन मॉल तसेच एमआयडीसी रोडवरील किशोर पंप कंपनी परिसरात आरोग्य विभागामार्फत ‘वेस्ट टू वंडर’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. वापरात नसलेले पाईप, प्लास्टिकच्या बाटल्या, लाकूड, माठ, दगड आदी वस्तूंना कल्पकतेचा स्पर्श देत त्यातून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. विविध रंगसंगती, रेखीव सजावट आणि भिंतींवरील अत्यंत कल्पकतेने रेखाटलेली चित्रांनी या परिसराचा संपूर्ण कायापालट केला आहे. एकेकाळी नागरिकांनी अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्याची जागा आता नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘अ’ क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे, सहायक आरोग्य निरीक्षक कृष्णा राऊत तसेच, अन्य महापालिका कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे कचऱ्यातून साकारलेली ही कला शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे. वेस्ट टू वंडर या अनोख्या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणे उजळून निघाली आहेत. हा प्रकल्प फक्त कचरा व्यवस्थापनापुरता मर्यादित न राहता, शहराच्या सौंदर्याचे प्रतीक बनत आहे.
…………
सार्वजनिक जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तेथे स्वच्छता करून तो परिसर टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्याचा उपक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक जागा स्वच्छ व सुंदर करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्या जागांची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
………
पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने विविध अभिनव उपक्रम राबवले जात असतात. वेस्ट टू वंडर ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे राबवली जात असून स्वच्छतेबरोबर कलात्मकता व सुंदरता जपण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका