पुणे : ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेला मूर्त रूप देत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. स्क्रॅप बसचे पुनर्वसन करून तयार करण्यात आलेल्या ‘मोफत वाचनालय बस’चे उद्घाटन फर्ग्युसन कॉलेज परिसरात आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. पंकज देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राऊत, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य प्रा. शाम मुडे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, अॅड्रानेट कंपनीचे प्रतिनिधी किरण रहाणे, राजेश साळवे, कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, वाहतूक नियोजन अधिकारी नारायण करडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या ‘स्क्रॅप बस वाचनालया’चा मुख्य हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे हा आहे. या बसमध्ये शैक्षणिक, प्रेरणादायी, धार्मिक, ऐतिहासिक आणि सर्वसामान्य ज्ञानविषयक विविध प्रकारची पुस्तके नागरिकांसाठी मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी वाचनालयासाठी तब्बल २५० पुस्तके भेट दिली. ‘वाचाल तर वाचाल!’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याशिवाय, अॅड्रानेट कंपनीचे प्रतिनिधी किरण रहाणे यांनी वाचनप्रेमींसाठी आणखी एक विशेष सुविधा जाहीर केली — या वाचनालय बसमध्ये मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे वाचकांना डिजिटल माध्यमातूनसुद्धा ज्ञानाचा विस्तार करता येईल.