मुंबई :
आजचा माणूस डिजिटल जगात सतत ‘कनेक्टेड’ असला तरीही तो भावनिकदृष्ट्या अधिकाधिक एकटा पडत चालला आहे. सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत प्रत्यक्ष संवाद हरवताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभावी व तणावमुक्त जीवन या विषयावर मंत्रालयात आयोजित ‘टेकवारी’ कार्यक्रमात बोलताना प्रेरणादायी वक्ते व लेखक प्रभू गौर गोपाल दास यांनी संवाद, समज आणि संतुलित तंत्रज्ञान वापरावर जोर दिला.
“डिजिटल संपर्क असूनही मनाने दूर…”
गौर गोपाल दास म्हणाले, “आज मोबाईल, सोशल मिडिया, सततचे ऑनलाईन असणे यामुळे खऱ्या अर्थाने माणसांमधील नातेसंबंध कमकुवत होत आहेत. संवाद हरवतोय आणि त्यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतोय. म्हणूनच डिजिटल युगात संवाद साधणं ही सध्याची सगळ्यात मोठी गरज आहे.”
टेक्नोसॅव्ही बना, पण तोल सांभाळा
“स्मार्टफोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कम्प्युटिंग, इंटरनेट – हे सगळं आपल्या जीवनाचा भाग झालं आहे. या बदलत्या युगात टेक्नोसॅव्ही होणं ही फक्त गरज नाही, तर एक अनिवार्यता आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. अनेक ऑनलाईन कोर्सेस, अॅप्स, आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्समुळे आज तंत्रज्ञान शिकणं अधिक सोपं झालं आहे, असे ते म्हणाले.
“शिकणं थांबवलं, म्हणजे वाढणं थांबलं”
गौर गोपाल दास यांच्या मते, आयुष्यभर विद्यार्थी राहा, कारण शिकणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नवीन भाषा, कौशल्य किंवा छंद हे मेंदूला कार्यरत ठेवतात. “जसजसं वय वाढतं, तसतसं मेंदूच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. यासाठी सतत शिकणं, वाचन, आणि मेंदूला चालना देणं महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
मानसिक आरोग्याचं भान ठेवा
प्रत्येकाने दररोज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवावा – ध्यान, वाचन, छंद किंवा मोकळ्या गप्पा यामुळे मन प्रसन्न राहतं. “तणाव, चिंता, एकटेपणा यावर उपाय म्हणजे भावनिक मोकळीक. मनातलं बोलणं व्यक्त करा किंवा लिहा – यामुळे मन शांत होतं आणि मानसिक आरोग्य टिकून राहतं,” असा सल्ला त्यांनी दिला.
संस्कृती आणि मूल्यं – डिजिटल युगातही अनमोल
“तंत्रज्ञानाची प्रगती होत असली तरी आपण आपल्या संस्कृती, नीतिमूल्य आणि परंपरा विसरता कामा नये. स्मार्ट आणि डिजिटल होणं गरजेचं असलं तरी आपले संस्कार टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
तंत्रज्ञान – आधुनिक काळातील नवा ‘देव’
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी एक मार्मिक विधान केलं – “या मंत्रालयाच्या मंदिरात आज तंत्रज्ञान हे नवं दैवत आहे आणि डिजिटल कौशल्य ही अभंगासारखी साधना आहे. यशस्वी भविष्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा भक्तिभावाने स्वीकार केला पाहिजे.”