पुणे: प्रतिनिधी
जमिनीच्या वादावरून गावकी मधली भांडण सर्वश्रुत आहे. मात्र, गावकी ने एकत्र येऊन आपापल्या जागा पानंद रस्त्यांसाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे. एकीकडे राज्य सरकारने पाणंदरस्त्यांना प्राधान्य दिलेल्या असताना जमिनीच्या खाजगी मालकीमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र, आडाचीवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जमिनी रस्त्यांसाठी देण्याबरोबरच श्रमदान करून रस्ते उभारणीमध्ये मोठा हातभार लावला असल्याची माहिती आडाचीवाडी गावाचे माजी उपसरपंच सूर्यकांत अनंतराव पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आडाचीवाडी, वाल्हे गावाचे माजी सरपंच दत्तात्रय यशवंत पवार, तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते नामदेव भरत पवार, अनिल गुलाब पवार, सचिन पोपट पवार, अरविंद लक्ष्मण पवार, दिलीप द्न्यानदेव पवार, अभिजीत बजरंग पवार आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम आम्ही गावकऱ्यांनी एकत्र बसून पाणंद रस्ते खुले करण्याबाबत एक बैठक घेतली. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची अडचण जाणून घेऊल, आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एक मताने १५ पाणंद रस्ते खुले करण्याचे ठरवले. सदर सर्व १५ पाणंद रस्त्यांची रोव्हरद्वारे मोजणी करुन जिओ-रेफरन्सिग करण्यात आले व त्याचे नकाशे तयार करण्यात आले. ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करुन रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेणेकामी तहसिलदार पुरंदर यांना अहवाल सादर करण्यात आला. सदर सर्व रस्ते ज्या सर्व्हे नंबरमधून जातात त्या ४३२ जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार घेऊन इतर अधिकारात रस्त्यासाठी ग्रामस्थांची वहिवाट अशी नोंद घेण्यात आली.
सदर रस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यात आली, सदर महापुरुषांची नावे व सांकेतिक क्रमांक नमूद असलेली प्रशस्त कमान रस्त्याच्या सुरवातीस उभारण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यापासून ३ फुट अंतरावर ३ मीटर अंतराने नारळ व जांभळाच्या एक हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात बाढ होते., निसर्ग संवर्धनास मदत (ऑक्सिजन) होते. रस्त्याची हद्द निश्चित झाली.
झाडांच्या निगराणीसाठी २०० झाडांमागे १ अशा ५ बेरोजगार मुलांना मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात आला. वरील १५ पाणंद रस्त्यांपैकी १.५ कि.मी. लांबीच्या एका रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झालेले असुन नव्याने एकूण ३.५ किलोमीटर लांबीच्या ३ पाणंद रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण काम नुकतेच सुरु करण्यात आलेले आहे. विविध दानशूर व्यक्ती, कंपन्या, संस्था तसेच शासनाच्या मदतीने उर्वरित पाणंद रस्त्यांचे कोक्रिटीकरण सुध्दा नजीकच्या भविष्यात पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
१२ फूट रुंदीचे एकूण ५ किलोमीटर लांबीचे उच्चप्रतीचे सिमेंट काँक्रिटचे ४ पाणंद रस्ते असलेली, त्याचबरोबर एकाच दिवशी १५ पाणंद रस्त्यांची मोजणी करुन त्यावरील किरकोळ अतिक्रमणे दूर करुन, सदर रस्त्यांना महापुरुषांची नावे देऊन, रस्त्याच्या सुरुवातीस रस्त्याचे नाव व सांकेतिक क्रमांकाची कमान उभारणारी, त्याची भूमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या अभिलेखांमध्ये नोंद घेऊन रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांच्या निगरणासाठी मनरेगा अंतर्गत गावातील बेरोजगार मुलांची नेमणूक करणारी आडाचीवाडी ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत असेल, आडाचीवाडी ग्रामपंचायतीचे हे कार्य महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरेल यात दुमत नाही.
या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने गावाला विशेष सन्मान दिला आहे. खुद्द राज्य सरकारने पाणंद रस्त्यांच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतलेल्या असताना शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता जनसहभागाने पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्याच्या गावाच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
