पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 95.81 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 1.98 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुली अव्वल ठरल्या आहेत.पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये निकाल जाहीर करण्याची परंपरा होती. यंदा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनालाईन पद्धतीने भरण्याचे बंधन घालण्यात आल्यामुळेच निकाल लवकर जाहीर होत आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते.मुलींचा निकाल 97.21 टक्के लागला आहे तर, मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने अधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 99 टक्के तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 94.73 टक्के आहे.
* विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44
नागपुर – 94.73
संभाजीनगर – 95.19
मुंबई – 95.83
कोल्हापूर – 97.45
अमरावती – 95.58
नाशिक – 95.28
लातूर – 95.27
कोकण – 99.01