लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून मंत्रिपद सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. पक्षनेतृत्वाला भेटून ते तशी विनंती करणार आहेत.खुद्द फडणवीस यांनीच आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आमचे मुंबईचे अध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्याचं काम केलं. मात्र जागा कमी आल्या आहेत ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले. लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व मी करत होतो. त्यामुळं जो काही पराभव झाला आहे. जागा कमी आल्या आहेत त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. मी कमी पडलो. हे मी स्वीकारतो. ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करणार आहे. विधानसभेच्या तयारीसाठी मला आता पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळं मला सरकारमधून मुक्त करावं अशी विनंती पक्षनेतृत्वाला करणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ‘मला पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ देता यावा या हेतूनं मी तशी इच्छा व्यक्त करणार आहे. त्यांच्या सल्ल्यानं मी पुढं काम करेन,’ असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाचं त्यांनी विभागवार विश्लेषण केलं. महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी भाजप आणि महायुतीला मिळालेली मतं खूपच जास्त आहेत. मुंबईतही भाजपला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. मुंबईत महाविकास आघाडीला २४ लाख मतं मिळाली आहेत, तर आम्हाला २६ लाख मतं मिळाली आहेत, असं ते म्हणाले. राज्यात आमच्या अनेक जागा अगदी थोड्या फरकानं पडल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीला या निकालाचा मानसिक फायदा नक्की होईल, पण तळागाळात आमचा पक्ष अजूनही मजबूत आहे. आम्ही आमच्या त्रुटी दूर करून पुन्हा एकदा लोकांपुढं जाऊ, असं फडणवीस म्हणाले.