पुणे : आयुर्वेद शास्त्र प्राचीन असून त्याकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु गेल्या काही वर्षात आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे लक्ष वेधले गेले आहे. सर्वांगिण आरोग्य उत्तम, निरामय ठेवण्यासाठी आयुर्वेद शास्त्र उपयुक्त आहे. डॉ. विद्याधर कुंभार लिखित ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या पुस्तकाद्वारे आयुर्वेदिक शास्त्राचे समग्र ज्ञान प्राप्त होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.
डॉ. विद्याधर कुंभार लिखित ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. 21) ध्रुव ऑडिटोरिअम, इंदिरा कॉलेज, वाकड येथे आयोजित करण्यात आला होता. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भटकर आणि संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. भटकर बोलत होते. ‘होलिस्टिक ॲन्सर्स फ्रॉम आयुर्वेदा’ या पुस्तकाचे संपादन डॉ. विजय भटकर यांनी केलेले आहे.
इंदिरा कॉलेजच्या संस्थापक डॉ. तारिता शंकर, ‘इंदिरा’चे सीईओ डॉ. पंडित माळी, प्रा. चेतन वाकळकर यांची उपस्थिती होती.
शारीरिक स्वास्थ उत्तम असल्यास व्यक्ती चांगल्याप्रकारे कार्यरत राहू शकतो, असे सांगून डॉ. भटकर पुढे म्हणाले, आयुर्वेद शास्त्राची उपयुक्तता लक्षात घेऊन आयुर्वेदातील भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर देश-विदेशात होऊ लागला आहे, ही समाधानाची बाब आहे.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असताना कामाप्रती निष्ठा ठेवल्यास त्याचा ताण जाणवणार नाही. वेळेचे योग्य नियोजन, सतत नवीन शिकण्याची उर्मी, अडणीतून मार्ग काढण्याच्या युक्त्या यावर लक्ष केंद्रीत केल्यास मनाच्या स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्यही उत्तम राहू शकते.
पुस्तक लिखाणाविषयी मनोगत व्यक्त करून डॉ. विद्याधर कुंभार म्हणाले, आजच्या काळात आपण घरगुती उपचार विसरलो आहोत. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींसाठी बरेचदा डॉक्टरकडे जाणे आवश्यक नसते. आयुर्वेदात परंपरेने सांगितलेले घरगुती उपचार केल्यास आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतो. अशा आयुर्वेदिक संकल्पनांची माहिती कळावी या करिता पुस्तकाचे लिखाण केले आहे.
आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचार लाभदायी ठरू शकतात, असे मत डॉ. तारिता शंकर यांनी मनोगतात व्यक्त केले.