पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. पदपथावरील अतिक्रममणांमुळे पादचारी अपघाताचे बळी ठरत आहेत. देशातील ९९ टक्के पादचाऱ्यांना अपघाताचा धोका असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. शहर आणि निमशहरी भागात पादचाऱ्यांना धोका थोडा कमी असला, तरी ग्रामीण भागात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यू होत असल्याचे यावेळी निष्पन्न झाले होते.
पदपथावरील अतिक्रमणासंदर्भात व वाढत्या अपघातांविषयी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत दुचाकींबरोबरच चारचाकीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अत्यंत अरूंद असल्यामुळे वाहतूककोंडी ही पुणेकरांसाठी नित्याचीच बाब बनली आहे. यासंदर्भात कोणतेही ठोस धोरण राज्य सरकार अथवा महापालिका प्रशासन ठरवत नाही.
एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असलेले पुणे आता आशिया खंडातील सर्वाधिक दुचाकींचे शहर बनले आहे. पुण्यात सध्या घरटी दोन ते तीन दुचाकी आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्यामुळे बहुतांशी पुणेकर दुचाकीला प्राधान्य देतात. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली, तरी पुण्यातील रस्त्यांची रुंदी मात्र तेव्हढीच आहे. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले असले, तरी ते पुरेसे नाही. अरूंद रस्त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना रोजच पुणेकरांना करावा लागतो. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे.
सुरवसे-पाटील पुढे म्हणाले, गेल्या काही वर्षांत नागरिकीकरण प्रचंड वाढले. मोठमोठ्या कंपन्या, भव्य दुकाने, उंचच उंच इमारती सर्वत्र उभ्या राहिल्या. मात्र, तेथील रस्तेही अरुंदच आहेत. पादचाऱ्याच्या सुरक्षेसाठी पदपथ बांधले असले तरी फेरीवाले आणि विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना त्याचा वापरही करता येत नाही. त्यातच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे काही ठिकाणी तर पादचाऱ्यांना चक्क रस्त्याच्या मध्यावरून चालणे भाग पडते. रस्ता ओलांडताना काळजी घेणे आवश्यक असून, पादचारी पूल, झेब्रा क्रॉसिंग पादचारी सिग्नलचा वापर केल्यास अपघाताचे प्रमाण काहीसे कमी होईल. फूटपाथवर झालेले अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाची उदासीनताही अपघातांना कारणीभूत आहे.
केवळ पुणे शहरच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत अरुंद रस्ते, अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या विक्रेत्यांना व्यवसायासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून देऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही अतिक्रमणे त्वरित हटवावीत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.