Pune rain news – पुणे – – शहरात मंगळवारी झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या दोन तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक रस्ते नदी-नाल्याचे स्वरूप धारण करत जलमय झाले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या तर काही ठिकाणी वाहने थेट पाण्यात अडकली.
दुपारी तीननंतर शहरात ढगाळ वातावरण तयार झाले आणि पाहता पाहता पावसाने झड दिली. पुणे वेधशाळेने यासंदर्भात पुढील सहा दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

🔹 रस्ते जलमय, वाहतूक ठप्प
सिंहगड रस्ता, डेक्कन परिसर, बाणेर, कात्रज चौक या प्रमुख भागांत पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. पावसामुळे नागरिकांना कार्यालय, शाळा-कॉलेज गाठताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
🔹 झाडपडीच्या ५० हून अधिक घटना
अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये ५० पेक्षा अधिक झाडपडीच्या घटना घडल्या. धानोरी, एरंडवणे, येरवडा, हडपसर, कोथरूड, कर्वेनगर परिसरात ही स्थिती अधिक गंभीर होती. तसेच दोन ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. धनकवडीतील ‘तीन हत्ती चौक’ आणि हिंगणे खुर्दमधील अक्षय कॉम्प्लेक्स येथे भिंती कोसळल्या.
🔹 धोकादायक होर्डिंग कोसळले
धानोरीतील पोरवाल रोड येथे एक मोठे लोखंडी होर्डिंग पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
🔹 पालिकेच्या नियोजनाचा फज्जा
नालेसफाईचा खर्च करूनही रस्त्यावर पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली गुप्त झाल्याने वाहनचालकांची कसरत झाली. येरवडा, कल्याणी नगर भागात तर वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. काही भागांत अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली होती.