शिरूर – पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची चर्चा असताना शिरुर तालुक्यातही अशीच एक घटना घडली. पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलगी चालवत असलेल्या मालवाहू पिकअपने धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अपघातात गंभीर जखमी झाला आहे. अपघात इतका भीषण होता की पिकअपने दुचाकीला २० ते ३० फूट फरफटत नेले. ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबबात मिळालेली माहिती अशी की, पोलीस पाटलाच्या १५ वर्षीय मुलीने मालवाहू पिकअप चालवला. यावेळी तिच्या शेजारी वडील बसले होते. तिने दुचाकीवरून जाणाऱ्या ३० वर्षीय तरुणाला धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अरुण मेमाणे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर महिंद्र बांडे हा जखमी झाला आहे.
पिकअप क्रमांक एम एच १२ एस एफ ३४३९ अरणगावातील पोलिस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी चालवत होती. तिच्यासोबत शेजारील सिटवर पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे बसले होते. सदर मुलीने तिच्या ताब्यातील पिकअप हा जोरात भरधाव वेगात चालवला. रस्त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यानंतर तिने २० ते ३० फूट दूर दुचाकी फरफटत नेली. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्वेनगरमध्ये क्रेनने चिरडल्याने सायकलस्वाराचा मृत्यू
पुण्यात क्रेनने चिरडल्याने सायकलस्वार मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी सायकलिंगसाठी गेलेल्या मुलाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्वेनगर परिसरात हा अपघात घडला. अपघातस्थळी रक्तामांसाचा चिखल झाला होता. मुलाच्या अंगावरून क्रेनचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संताप व्यक्त केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे.