पुणे-
मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे होतोय. उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केलं. मी उशीर केला असं ते म्हणाले. आता पक्ष प्रवेश करणार आहे, बाकी चर्चा पुढे होईल, असे वसंत मोरे म्हणाले. तसेच आज नाही तर येत्या ९ तारखेला मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार असल्याचे मोरे यांनी जाहीर केले आहे. मी मनसे सोडून वंचितमध्ये गेलो होतो. मात्र मतदारांनी मला स्वीकारले नाही, असेही त्यांनी वंचित सोडण्याचे कारण सांगितले. पुण्यात शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीत कडवे आव्हान देणार असल्याचे मोरे म्हणाले.
वसंत मोरे यांनी आज उबाठा शिवसेनेचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वगृही येताय, पण उशीर केला असे म्हटल्याचे मोरे यांनी सांगितले.तसेच आपण ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही मोरे यांनी जाहीर केले.
विधान सभा लढविणार का या प्रश्नावर मोरे यांनी आता पक्ष प्रवेश करू, नंतर यावर चर्चा करू असे मोरे म्हणाले. तसेच विधासभा लढविण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत. खडकवासला आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो. लोकसभेला पुणे शहरात माझे मतदान नव्हते, माझा तो भागही नव्हता. तरीही मला चांगली मते मिळाली आहेत. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.