पंढरपूर, – : आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यात मोठी तयारी सुरू असून, पालखी मार्गावरील सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ३० जून रोजी तर संत तुकाराम महाराजांची पालखी १ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. या सोहळ्यांमध्ये लाखो भाविक सहभागी होत असल्याने, पालखी मार्ग, विसावा केंद्रे व तळांवर आवश्यक सर्व सोयी-सुविधा वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे पार पडलेल्या तयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुढील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला:
- पालखी मार्ग व तळांवर शौचालये, हिरकणी कक्ष, चेंजिंग रूमची संख्या वाढवावी
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण रस्ते कामे त्वरित पूर्ण करावीत
- भंडीशेगाव येथील धोकादायक इमारती तत्काळ पाडाव्यात
- पिराच्या कुरोली रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा
- एस.टी. बसस्थानकांवर प्रवाशांसाठी शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था करावी
तसेच, यात्रेच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले की, “पालखी प्रमुख व भाविकांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने घेऊन प्रशासनाने कामे तत्काळ पूर्ण करावीत. वारकरी भाविकांसाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.”
