धनकवडी- श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टतर्फे शिव-उपासना महायज्ञ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ७१ दाम्पत्यांनी धार्मिक विधीत सहभाग नोंदवला. या वर्षी दाक्षिणात्य पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या महा अभिषेक आणि लघुरुद्रा वेळी नादस्वरम आणि चेंडा मेलम हे खास दाक्षिणात्य परंपारिक शास्त्रीय वादन करण्यात आले. आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंडपात भव्य व्यासपीठावर मोठे यज्ञकुंड तयार करण्यात आले होते. रुद्रमंडल, ग्रहमंडल तसेच सर्व देवी-देवतांची या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. शिवपिंडीवर om namshivay सर्व विश्वस्तांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला.
या वेळी मुख्य पुरोहित विरेंद्र दीक्षित यांच्या पौरोहित्याखाली एकवीस घनपाठी आचार्यांनी एकाच लयीत व सुरात रूद्रपठण केले. मंत्रवेदांच्या उद्घोषाने मठाचा परिसर दुमदुमून गेला होता. पूजा व हवनात प्रत्यक्ष सहभाग लाभल्याने आत्मिक समाधान लाभल्याची भावना प्रत्येकाने व्यक्त केली. ट्रस्टतर्फे सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. यामध्ये खास दक्षिणात्य अवियल, सांबार, रसम, भात, डाळ वडा आणि पायसम याचा समावेश होता. या वेळी विश्वस्त मंडळाचे डॉ. मिहिर कुलकर्णी, सतीश कोकाटे, सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, राजा सुर्यवंशी, निलेश मालपाणी, प्रताप भोसले सहपरिवार उपस्थित होते.