परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचा पिंपरीत भव्य सत्कार
पिंपरी,-सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाजाने चांगले काम केले आहे. ते जेथे जातील तेथे लोकांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या समाजातील बेरोजगार युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांची नियुक्ती केली आहे. या महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा लाभ घेऊन युवकांनी उद्योग व्यवसाय उभारून देश विकासात हातभार लावावा असे आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी केले.

विप्र फउंडेशन च्या वतीने प्राधिकरण आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ब्राह्मण समाजातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) निवृत्त कॅप्टन आशिष दामले यांचा पुणेरी पगडी, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, राष्ट्रीय विप्र महासंघ अध्यक्ष सुभेदार तिवारी, समन्वयक अनिल शर्मा, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली अध्यक्ष प्रमोद भावसार, सीमा जोशी, ब्राह्मण नारी एकता मंच अध्यक्ष संजीवनी पांडे, सुनील कौशिक, नवीन शर्मा, रवींद्र कौशिक, हरि शर्मा, लवकांत शर्मा, वैभव मोरे आदींसह समाजातील बहुसंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी शिवानी भारद्वाज व दीपिका शर्मा यांनी भजन सादर केले. तसेच परशुरामाच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.
सत्काराला उत्तर देताना कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज हा सहिष्णू समाज आहे. पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबातील युवकांना रोजगाराच्या समस्या आहेत. आता परशुराम आर्थिक विकास मंडळास भरघोस निधी मिळाला आहे. युवकांनी स्टार्टअप सुरू केल्यास १५ लाख रुपयांचा व्याज परतावा, भागीदारीत केलेल्या व्यवसायासाठी ५० लाख रुपयांचा व्याज परतावा आणि देशांतर्गत शैक्षणिक कर्जासाठी १० लाख आणि परदेशातील शैक्षणिक कर्जासाठी २० लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाच्या वतीने देण्याचे नियोजन करणार आहे. त्याचा युवकांनी लाभ घेऊन सक्षम व्हावे. जयपूर येथे उभारण्यात आलेल्या परशुराम भवन प्रमाणे राज्यातील सर्व विभागात परशुराम भवन उभारले जावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. कल्याण डोंबिवली येथे जागा मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. महामंडळाच्या निर्मितीच्या नऊ महिन्यांतच पुण्यात पहिले ब्राह्मण भवन कार्यालय सुरू झाले आहे. भगवान परशुरामांचे नाव कुठेही कमी होऊ देणार नाही. तर समाजाचा अभिमान आणि स्वाभिमान जपला जाईल असे कार्य या महामंडळाच्या वतीने करण्याचा विश्वास दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार उमा खापरे यांनी सांगितले, ब्राह्मण युवक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे हे महामंडळ स्थापन करून चालना दिली आहे.
आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, ब्राह्मण समाज सर्वात स्फूर्तीदायी समाज आहे. या समाजाकडून अनेक गोष्टी शिकता येतात. स्पर्धा परीक्षेत पास होऊन अधिकारी होणारे ब्राह्मण समाजातील लोक जास्त असतात.
माजी महापौर योगेश बहल यांनी सांगितले की, भक्ती शक्ती चौक येथे परशुरामाचे शस्त्र असणाऱ्या “परशु” ची स्थापना करून विकसित केलेले उद्यान सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करू. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत परशुराम भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करू.
या कार्यक्रमाच्या आयोजनात विप्र फाउंडेशन, गौड ब्राह्मण संघठन पुणे, पारीक ब्राह्मण समाज, खंडेलवाल ब्राह्मण समाज, पुना सिखवाल ब्राह्मण समाज, श्री राजस्थानी छ:न्याती विप्र मंडल, राजपुरोहित ब्राह्मण समाज, अखिल ब्राह्मण संघ महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन ब्राह्म समाज, सिद्धिविनायक संस्थान, दाधीच समाज सेवा संघ, बाँड ब्राह्मण संघटन, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, सारस्वत ब्राह्मण समाज, श्रीगौड ब्राह्मण समाज, ११ परगना राजपुराहित समाज, श्री महर्षी गौतम गुर्जरगौड ब्राह्मण सेवा संस्था, समस्त ब्राह्मण समाज व संघटना पिंपरी चिंचवड पुणे यांनी सहभाग घेतला होता.
स्वागत अनिल शर्मा, सूत्रसंचालन शुभम खेडेकर आणि मदनलाल कौशिक यांनी आभार मानले.