पिंपरी, १७ एप्रिल २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे होणार आहे.
या वेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.
या स्मारकासाठी सुमारे १३ कोटी ५२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा दोन मजली पारंपरिक लाकडी वाडा जतन करण्यात आला आहे. यात चापेकर बंधूंच्या कौटुंबिक जीवनाचे तसेच स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे चित्रण करण्यात आले आहे. आधुनिक एआर/व्हीआर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घटनांचा सजीव अनुभव देखील येथे अनुभवता येणार आहे.
१८९७ मध्ये प्लेगच्या काळात ब्रिटिश अधिकारी रँड यांचा वध करून स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चापेकर बंधूंच्या स्मृतीस वंदन करणारे हे स्मारक, भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
.