पुणे : पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका सराफी पेढीवर दरोडा टाकून सव्वा कोटी रुपयांचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ७० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, चोरट्यांना पकडताना पोलिसांनी थेट नदीत उडी मारत जिगरबाज कामगिरी केली. या प्रकरणी अंकुश दगडू कचरे (वय २०) आणि गणेश भांबु कचरे (वय २३, दोघे रा. कात्रज) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. २६ डिसेंबर रोजी खानापूर गावातील सराफी पेढीवर भरदिवसा कोयता व तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. घटनेनंतर गुन्हा दाखल होताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. हवेली आणि ग्रामीण पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासात आरोपी दुचाकीवरून पानशेत परिसरातून राजगड (वेल्हे) तालुक्याच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच आरोपींनी दुचाकी रस्त्यात सोडून दिली आणि नदीत उडी मारली. त्यानंतर पोलीस कर्मचारी गणेश धनवे आणि सागर नामदास यांनीही क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. पोहताना दमछाक झाल्यामुळे आरोपी अंकुश कचरे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याचे साथीदारही पकडण्यात आले.
आरोपींकडून कोयते, तलवारी, दुचाकी आणि ७० लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह संपूर्ण पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
अंकुश कचरे याच्याविरुद्ध यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असून, त्याने व त्याच्या साथीदारांनी आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. दरोडा टाकण्यापूर्वी आरोपींनी सराफी पेढीची रेकी केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या धाडसी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.


