मुंबई,-: महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून श्री. राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव असणारे नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. गेल्या सव्वादोन वर्षांपासून श्री. पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी याआधीच्या सेवेत लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांनी महसूलवाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. सोबतच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारीपाल्यांची अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदींना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रमांमुळे पुणे लघु प्रशिक्षण केंद्राला सलग तीन वर्ष राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यापूर्वी श्री. पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ राहून मुंबईचा महापूर, पुण्यातील ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ चक्रीवादळे, ‘कोरोना’ आदी संकटांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.
श्री. राजेंद्र पवार, संचालक (मानव संसाधन) – ‘महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मानव संसाधनाचे एक आश्वासक व्यवस्थापन सदैव उपलब्ध राहील. कंपनी व कर्मचारी हिताला प्राधान्य देत अंतर्गत प्रशासकीय कामकाज आणखी गतिमान करण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यावर भर राहणार आहे.’
————————————————————–

महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून श्री. सुनील काकडे यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची संचालक (मानव संसाधन) म्हणून थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. काकडे यांची पुणे येथे बदली झाली आहे.
मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असलेले श्री. काकडे १९९७ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळामध्ये सहायक अभियंता म्हणून रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या पदावर त्यांनी चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, छत्रपती संभाजीनगर येथे काम केले. तर २०१७ पासून पदोन्नतीने अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी कल्याण, अहिल्यानगर, भांडूप येथे काम केले. श्री. काकडे यांची डिसेंबर २०२२ मध्ये मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली. ते भांडूप परिमंडलात कार्यरत होते. आता पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांची बदली झाली आहे.
पुणे परिमंडलामध्ये ‘इझ ऑफ लिव्हिंग’नुसार तत्पर ग्राहकसेवा तसेच सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासोबतच महावितरणच्या महसूलवाढीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी सांगितले.