पुणे – महिलांच्या कलागुणांना व उपक्रमशीलतेला प्रोत्साहन देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हा महोत्सव दिनांक २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता होणार असून, विशेष कामगिरी करणाऱ्या दोन महिलांना ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुण्यातील १०० हून अधिक महिला सफाई कामगारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या महोत्सवाच्या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले आहे. पाककला, होम मिनिस्टर, फॅन्सी ड्रेस, म्युझिकल तांबोला (हाउजी) यांसारख्या स्पर्धा होणार असून, धार्मिक कार्यक्रमांतर्गत श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, श्रीसूक्त पठण, कन्यापूजन आणि महाआरती यांचे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यांना व सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. उद्घाटन सोहळा, सर्व स्पर्धा व विशेष कार्यक्रम श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे होणार आहेत.
या स्पर्धांसाठी महिलांची नावनोंदणी सुरु झाली असून, इच्छुकांनी सौ. जयश्री बागुल (माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्यलयात, ओटा क्रमांक १२, शिवदर्शन, पुणे) येथे किंवा मोबाईल क्रमांक ९८८१७३७२४६ वर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी केले आहे.