पिंपरी- व्याख्यानमाला म्हणजे विचारांचे आदान – प्रदानाचे हक्काचे व्यासपीठ, जीवनाला समृद्ध वाटेने घेऊन जावे या उदात्त हेतूने उत्तमोत्तम अशा व्याख्यानांचा नजराणा स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळांने गेल्या चार दशकांपासून रसिकांपुढे खुला केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ,निगडी प्राधिकरण आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचा प्रारंभ महाराष्ट्र दिनी, गुरुवार, ०१ मे पासून होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, प्राधिकरण, निगडी येथे दररोज सायंकाळी ठीक ७:०० वाजता व्याख्यानाची सुरुवात होईल. ४१व्या वर्षात पदार्पण करणार्या छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेमध्ये गुरुवार दिनांक ०१ मे रोजी राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी ‘वक्फ कायदा समजून घेताना’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफतील. शुक्रवार, दिनांक ०२ मे रोजी शिवव्याख्याते नीलेश भिसे ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजीमहाराज’ हा विषय मांडतील. शनिवार, दिनांक ०३ मे रोजी स्तंभलेखक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ‘अमेरिकन ‘टॅरिफ’च्या भयकंपाचे वास्तव’ या विषयाच्या माध्यमातून तृतीय पुष्पाची गुंफण करतील; तर रविवार, दिनांक ०४ मे रोजी कार्पोरेट कीर्तनकार समीर लिमये ‘श्री समर्थांचे नेटवर्किंग’ या विषयावर अंतिम पुष्पाची गुंफण करणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी व पिंपरी चिंचवड शहरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर यांनी केले आहे.