आमदार महेश लांडगे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरासह समाविष्ट गावांमध्ये विकास आराखड्यातील रस्त्यांना भूसंपादनाचा मोठा अडथळा आहे. त्यामुळे तब्बल 42 ठिकाणी ‘‘मिसिंग लिंक’’ आहेत. संबंधित रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी ‘कृती आराखडा’ तयार करावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो सिटी’ अशी ओळख असलेल्या या शहरामध्ये 2014 नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीतील पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांच्या विकासाला चालना देण्यात आली.
परिणामी, गेल्या १० वर्षांमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये नागरीकरण आणि गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी आणि ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महापालिका हद्दीतील एकूण 42 ‘‘मिसिंग लिंक’’ आहेत. त्याचे काम पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. वाढत्या शहरीकरणाला पोषक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करता येणार आहेत, असेही आमदार लांडगे म्हटले आहे.
**
महापालिकेचे ‘मिसिंग लिंक’च्या कामाला प्राधान्य…
शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी पाहायला मिळते. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे रस्ते आणि पूल अपुरे पडत आहेत. ज्यामुळे रहदारीची कोंडी वाढली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वाढत्या वाहतूक समस्येचे निराकरण करण्यासाठी एक व्यापक कृती आराखडा हाती घेतला आहे. त्याद्वारे मिसिंग लिंकचे काम प्राधान्याचे पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा केला जात आहे. मात्र, भूसंपादनाअभावी मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यास अडथळे येत आहेत.
***
जिल्हाधिकारी प्रशासनाने भूसंपादनाचे काम पूर्ण करुन संबंधित जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत केली. तर आगामी काळात महापालिका प्रशासनाला संबंधित 42 रस्त्यांचे काम पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या अनुशंगाने, पिंपरी-चिंचवड शहरातील ‘‘मिसिंग लिंक’’ चे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कृती आराखडा तयार करावा, या करिता आम्ही पाठपुरावा करीत आहोत. शहरातील वाहतूक सक्षमीकरासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.