पिंपरी,-: मुख्यमंत्री १०० दिवसांच्या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी क्वालिटी कौन्सिल (QualityMatters)ऑफ इंडियाचे अधिकारी सुब्रतो घोष, एच. बी. चावला आणि जयेश यादव यांनी महापालिकेला भेट दिली.
या दौर्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिकेच्या विविध उपक्रमांचे संगणकीय सादरीकरण अधिकाऱ्यांसमोर सादर केले.

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था सरकारी कार्यालयांमधील कार्यप्रणालीची गुणवत्ता तपासून त्याचा अहवाल शासनाला सादर करते. विविध क्षेत्रांत गुणवत्ता सुधारणा हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
📍 विशेष ठळक बाब: महापालिका भवनाची प्रत्यक्ष पाहणी
कौन्सिलच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील सर्व चार मजले पाहिले. अभिलेख, स्वच्छतागृहे, नागरिक बैठक व्यवस्था, नागरी सुविधा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सोय, माहिती फलक, शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रांनी सजलेले जिने, दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा आणि प्रत्येक विभागातील अभिलेख मांडणी याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. स्थापत्य विभागाने लावलेल्या झाडांच्या कुंड्यांची सजावट पाहून अधिकाऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.