पुणे :
पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ११८ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यामध्ये ६३ महिला आणि ५५ पुरुष उमेदवारांचा समावेश असून, तब्बल १५ प्रभागांमध्ये चार पॅनल उभे करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रदेश युवासेना सचिव किरण साळी यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, भाजपशी युती व्हावी या उद्देशाने शिवसेनेने सन्मानजनक २५ जागांची मागणी केली होती. मात्र, युती न झाल्यामुळे शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमध्ये मनभेद निर्माण होऊ नयेत म्हणूनच आम्ही स्वबळावर मैदानात उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणी सातत्याने दबाव किंवा चिथावणी देत असेल, तर शिवसेना त्याला बळी पडणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेना अवास्तव मागण्या करत असल्याच्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, ते माजी महापौर होते आणि आज पुणे शहराच्या सध्याच्या परिस्थितीला ते कितपत जबाबदार आहेत, याचा त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
एकीकडे युतीधर्माची भाषा करायची आणि दुसरीकडे शिवसेनेचे नगरसेवक पक्षात घेऊन त्या जागांवर दावा सांगायचा, हे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका गोऱ्हे यांनी मांडली. शिवसेनेला कुणाच्या दातृत्वाची गरज नाही. मात्र, आम्हाला योग्य सन्मान मिळाला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
युती केली किंवा केली नाही, यावरून शिवसेना लहान-मोठी ठरत नाही, असे सांगत जनता जनार्दन आमच्यावर किती विश्वास ठेवते, यावरच आमचे समाजातील स्थान ठरते, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, येत्या ९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात शिवसेनेच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या दौऱ्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला आणखी गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला


