पिंपरी-चिंचवड शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड संघटना आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडी यांनी संयुक्तपणे प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. रईसा पठाण व सौ. रमा बनसोडे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. आज दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या कार्यालयात दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

या प्रसंगी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा कुमारी दुर्गा भोर आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उमेदवारी जाहीर करण्यात आली.
सौ. रईसा पठाण आणि सौ. रमा बनसोडे या दोघीही दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य, आंदोलन, उपोषण तसेच समाजाच्या हक्क आणि न्यायासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. दोघीही लघुउद्योजिका असून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे.
दुर्गा ब्रिगेड संघटनेने शहरात विविध सामाजिक अभियान, आंदोलने आणि उपोषणांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात संघटनेच्या शेकडो स्वयंसेविकांनी महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर तसेच शहरातील विविध भागांत नागरिकांच्या मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अन्नधान्य वाटप, आरोग्यविषयक मदत आणि सामाजिक उपक्रमांतून संघटनेचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवणे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, महिला सक्षमीकरणाला चालना देणे आणि सर्वांगीण विकास साधणे यासाठी सौ. रईसा पठाण व सौ. रमा बनसोडे कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांना प्रभागातील नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.


