पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदी पात्रावर राबवित असलेल्या नदी सुधार प्रकल्पावर जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि वृक्षतोडीबाबत पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या माहितीवरून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना तात्काळ प्रकल्पाचे काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पिंपरी चिंचवडसह पुण्यातील 100 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला आहे. यासाठी पिंपले निलख येथील शहिद अशोक कामठे उद्यान ते मुळा नदीकाठापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. आंदोलनात नागरिकांनी नदीसाठी श्रद्धांजली अर्पण करत नदी संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. यावेळी लघुनाटिका सादर करण्यात आली आणि पर्यावरण संरक्षणावर चर्चा केली गेली.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, नदी सुधार योजनेच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत आपले विचार मांडले. त्यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले की, नदी सुधार प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवले जावे. यासोबतच त्यांनी यासंबंधी चौकशी करणार असल्याचे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
वृक्षारोपणातून नोंदविला अनोखा निषेध:
आंदोलकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण केले. त्यांनी कार्यरत असलेल्या ठिकाणी झाडे लावून पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित केली. यावेळी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
विदेशातील अनुकरण नको:
विदेशातील नद्यांचे अनुकरण करत पिंपरी-चिंचवड शहरात नदी सुधार प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मात्र आंदोलकांनी मत व्यक्त केले की, नदीचे नैसर्गिक रूप, जैवविविधता आणि प्रदूषणमुक्ती यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.