Sant Dnyaneshwar Maharaj – आळंदी (पुणे): महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील अनमोल रत्न, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्यास आळंदी नगरीत उत्साहात सुरुवात झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या भव्य सोहळ्याचा शुभारंभ झाला. 3 मे ते 10 मे 2025 या कालावधीत हा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत असून, संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक, वारकरी आळंदी नगरीत दाखल झाले आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी पूजनाने झाली. वारकरी संप्रदायाचे मुख्य संप्रदाय प्रमुख डॉ. नारायण जाधव महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचे पूजन झाले तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पूजनात भाग घेतला.(Saptashatakottar Suvarna Mahotsav)
या पर्वणीच्या निमित्ताने आळंदीत अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव आणि संगीत महोत्सव यांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ६ ते रात्री १०.३० दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नामवंत महाराजांचे प्रवचन, भजन आणि कीर्तन हे यामध्ये विशेष आकर्षण ठरणार असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या उत्सवात सहभागी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या सोहळ्याला सुरुवातीपासूनच भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी १०,००० ते १२,००० वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरीचे पूजन केले आणि दर्शन घेतले.

आळंदी देवस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे यांनी सांगितले की, “हा सोहळा केवळ एक धार्मिक प्रसंग नसून, ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची उजळणी करणारी पर्वणी आहे. सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असा आमचा आग्रह आहे.”
सप्तशतकोत्तर सोहळ्यात अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. संत माऊलींच्या विचारांची गोडी लावणारा हा सोहळा नवी पिढीपर्यंत वारकरी संप्रदायाचा गाभा पोहोचवतो आहे.
10 मे 2025 रोजी या भव्य सोहळ्याची सांगता होणार असून, त्या दिवशी विशेष कीर्तन, पालखी प्रदक्षिणा आणि प्रसाद वाटपाचे आयोजन होणार आहे.