मुंबई : अंशतः अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गेली अनेक वर्षे अत्यल्प वेतनावर काम करत असून, त्यांना शंभर टक्के वेतन देण्याची मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या मागणीचा आवाज आता शासनदरबारी पुन्हा एकदा बुलंद झाला आहे.
या मागणीसंदर्भात नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत (पुणे विभाग) यांनी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, “या संदर्भातील प्रक्रिया सरकारकडून सुरू असून लवकरच अंमलबजावणी होईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
दत्तात्रय सावंत यांनी सांगितले की, १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन आदेशही निर्गमित करण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आंदोलनाद्वारे शासनाला स्मरण करून देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

या बैठकीत कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांचीही उपस्थिती होती. या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सरकार शिक्षकांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असून, येत्या अधिवेशनात टप्पा वाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करून कार्यवाही केली जाईल.“
दरम्यान, आंदोलन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारकडून लवकरात लवकर ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.