एसएनडीटी (प्रतिनिधी): इरावती कर्वे यांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालावधी समाजशास्त्रीय आणि मानवशास्त्रीय कामासाठी समर्पित केला. नव-समाजरचनेचे प्रारुप घडविण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ लेखिका आणि समाजशास्त्राच्या अभ्यासक डॉ. प्रतिभा कणेकर यांनी काढले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारात भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्र-कुलगुरु डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर तसेच प्रियदर्शनी कर्वे विचारमंचावर उपस्थित होत्या.

इरावती कर्वे यांनी जनुक-शास्राचा अभ्यास करून जातीव्यवस्थेची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. चांगला समाज आणि चांगली समाजव्यवस्था घडविण्यासाठी समाजशास्त्राचा सखोल अभ्यास व्हावा, असा इरावतींचा आग्रह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. चक्रदेव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हा उपक्रमशील दिवस ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त केली. सबल संस्कृता घडविण्यासाठी महिला शिक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवते. याकामी पाऊल टाकताना महर्षी कर्वे यांचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात, अशी भावना कुलगुरूंनी व्यक्त केली. महर्षी कर्वे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा त्यांच्या होवू घातलेल्या पुतळ्यातून नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी महर्षी कर्वे यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचा शुभारंभ डॉ. चक्रदेव यांच्या हस्ते झाला. त्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. प्राध्यापिका प्रिया जामकर यांनी सुत्रसंचालन केले तसेच, डॉ. सुभाष पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते व्हिजन डॉक्युमेंटचे अनावर करण्यात आले. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी व्हिजन डॉक्युमेंटचे निर्मितीचा उद्देश आणि वाटचाल स्पष्ट करून सांगितले. कार्यक्रमास विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तत्पूर्वी महर्षी कर्वे कुटीर येथे महर्षींच्या प्रतिमेस अभिवादन करून आवारातील विविध कार्यक्रमांची सुरुवात झाली.