
पंढरपूर :- आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सोहळ्याला सुरवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसर व दर्शनरांग गजबजली आहे. आषाढी सोहळ्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंडया श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री.संत तुकाराम भवन व श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी व आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने विठूरायाची नगरी लखलखली असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे, माय-बाप विठूरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.

आषाढी पालखी सोहळ्यातील तीन दिड्यांना श्री. विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार-
पंढरीची पायीवारी ही महाराष्ट्राची प्राचीन, अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्याची परंपरा अखंड राहण्यासाठी या परंपरेचे रक्षण व संवर्धन करणे हे आपल्या सर्व वारकरी वैष्णवांचे सर्व प्रथम कर्तव्य आहे. हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी व निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लॅस्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यासारखे सामाजिक विषयांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.आषाढी यात्रेतील सर्व सोहळ्यातील बऱ्याच दिंड्या हे कार्य करत आहेत, त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा. त्याच प्रमाणे इतर दिंड्यानीही त्याचा आदर्श घेवून या “निर्मल वारी, हरीत वारी अभियान” मध्ये सहभाग घ्यावा. या जाणिवेतून, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मार्फत आषाढी यात्रा कालावधीत “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” सन 2018 पासून सुरू करण्यात आला आहे.आषाढी पालखी सोहळ्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या दिंड्यांना आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व रक्कमेचा (प्रथम रू.1 लक्ष, द्वितीय रू.75 हजार व तृतीय रू.50 हजार) धनादेश देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, वृक्षमित्र ह.भ.प.शिवाजीराव मोरे या मंदिर समितीच्या तीन सदस्याची समिती गठीत करण्यात आली असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.
