महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये सुरू आहे मराठी साहित्ययात्री संमेलन
महादजी शिंदे एक्सप्रेसमधून (पुणे ते दिल्ली साहित्ययात्रा) : संत ज्ञानेश्वर महाराज यांची ओवी, संत तुकाराम महाराज यांचे अभंग, मोरोपंतांची आर्या, आणि तरुणाईची आधुनिक मराठी गीते, मराठी रॅप अशा विविधांगी कार्यक्रमांनी महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये उल्हासित वातावरण आहे.
98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निघालेल्या पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

देवा चांगभलं रं…, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीतापासून गण, गवळण, अभंग, भक्तीगीते, भावगीते, लावणी, हिंदी चित्रपट गीते आणि अगदी मंगलाष्टकांपर्यंत विविध प्रकारांचे सादरीकरण सुरू आहेे. मोठ्या उत्साहात साहित्यिक आणि साहित्य रसिक या फिरत्या चाकांवरील संमेलनात सहभागी झाले आहेत. साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि साहित्य या संदर्भात घ्यायच्या प्रश्नमंजुषेची तयारी देखील उत्साहात सुरू आहेत.
ओळख अहिल्याबाईंची..
साताऱ्याहून खास संमेलनासाठी आलेल्या जयश्री माजगावकर यांनी अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारली आहे. येणाऱ्या पिढीला अहिल्याबाईं होळकर यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने ही वेशभूषा साकारली असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेत साहित्यिक आणि साहित्य रसिक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत आहेत; ज्यामुळे प्रवास सुकर होत असल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.
हवामानाचा ठोसा
अंघोळीची गोळी आणि खिळे मुक्त झाडे या अभियानाचे प्रमुख माधव पाटील यांच्या ‘हवामानाचा ठोसा’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण विविध साहित्यिक आणि रसिकांच्या हस्ते या प्रवासात करण्यात येत आहे. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आपण छोट्या-छोट्या कृती स्वत: करून सुधारणा करू शकतो या भावनेने हवामान बदलावर करता येणारे उपाय या विषयी ‘हवामानाचा ठोसा’ हा उपक्रम राबविला जात असल्याचे माधव पाटील यांनी यावेळी सांगितले.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा…
महादजी शिंदे एक्स्प्रेसमध्ये नव साहित्यिकांचा उत्साह आणि ज्येष्ठ साहित्यिकांचे अनुभवविश्व यांचा सुरेख मेळ साधला गेला आहे. चारोळी ते कीर्तन आणि अभिजात ते संस्कृतीरक्षण अशा विविध विषयांना हात घालत होता. फिरत्या चाकांवरचे संमेलन दिल्लीच्या दिशेने पुढे चालले आहे. 16 डब्यांच्या रेल्वेत प्रत्येक डब्यात छोट्या-मोठ्या समुहांद्वारे स्वतंत्र उपक्रम सुरू आहेत. पुण्याच्या अनुबंध प्रकाशनच्या अस्मिता कुलकण, साहित्य प्रेमी भार्गवी कुलकण, डॉ. हनुमंत जाधवर, वसंतराव जाधवर आदींनी स्वरचित कवितांची मैफल रंगविली. औदुंबर येथील 8-9 भावंडांच्या जोशी कुटुंबांचे सदानंद साहित्य मंडळ प्रकाशन संस्थेत कार्यरत आहे. त्यातील चार-पाच भावंडांनी सहकुटुंब या संमेलनाच्या प्रवासात सहभाग घेत कथा-कथन, कविता वाचन आदींचा जागर केला आहे.
लोगो साकारणारे प्रसाद गवळी यांचा कुटुंबियांसह संमेलनात
लोणी काळभोरहून निघालेल्या प्रसाद गवळी यांनी साहित्य संमेलनाचा लोगो डिझाईन केला आहे. त्यांचा विशेष सन्मान या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. हा सन्मान स्वीकारायला गवळी यांच्या कुटुंबियांसह त्यांचे 14 महिन्यांंचे बाळही आहे. तबला-पेटीच्या संगतीने वामनदादा कर्डकांच्या पोवाड्यापासून अगदी हिंदी चित्रपट गीतांच्या गाण्यांपर्यंत येऊन रंगतो आहे. महाराष्ट्राच्या विविध गावातून सहभागी झालेल्यांमध्ये लेखक, प्रकाशकांसह, युवा साहित्य प्रेमींचा उत्साह दांडगा आहे.
उत्साह आणि उत्सुकता
दिल्लीतील संमेलनाच्या उद्घाटन सत्रात नृत्य सादरीकरणासाठी पुण्याच्या मराठी भाषा संवर्धन समुहाच्या 18 ते 22 वर्षे वयोगटातील 30 मुलांचा सहभाग आहे. त्यांनाही सादरीकरणाची उत्सुकता आणि उत्साह असल्याचे जाणवले. नाशिकच्या ‘गोदावरी’ समुहाच्या पाचवी ते आठवीतील आठ मुली नृत्य सादरीकरणासाठी रेल्वेमध्येच हातांवर मेहंदीची नक्षी काढण्याचा गर्क आहेत.
सोयी-सुविधांबाबत संजय नहार यांच्याविषयी कृतज्ञता
महादजी शिंदे रेल्वेने पुणे ते दिल्ली प्रवास करणाऱ्या साहित्यिकांनी व साहित्य रसिकांनी रेल्वेत ठेवलेल्या बडदास्तीविषयी समाधान व्यक्त केले आहे. संमेलनाचे आयोजन सरहदचे संस्थेचे संजय नहार आणि त्यांच्या सर्व मदतनीसांची सर्वांनीच मुक्तकंठाने स्तुती करत त्यांच्या विशेषी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत.