अदानी समूहाचे सर्वेसर्वा व भारतातील एक चर्चेतील उद्योगपती गौतम अदानी यांनी मोठी बातमी दिली आहे. वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळं उद्योग वर्तुळात अदानी समूहाच्या वारसदाराच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.व्यवसाय टिकवायचा असेल तर योग्य उत्तराधिकारी असणं खूप महत्त्वाचं आहे. मी ही निवड दुसऱ्या पिढीवर सोपवली आहे. जेणेकरून बदलाची ही प्रक्रिया हळुवार आणि अतिशय पद्धतशीर व्हावी, असं अदानी यांनी ब्लूमबर्गला सांगितलं.अदानी निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वारसदार जीत, करण, प्रणव आणि सागर हे अदानी समूहाच्या कौटुंबिक ट्रस्टचे समान लाभार्थी होतील. समूहातील विविध कंपन्यांच्या समभागांचे हस्तांतरण गोपनीय कराराद्वारे केलं जाईल, असं ब्लूमबर्गने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.