पुणे -पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (पीडीए) 15 ऑक्टोबरपासून 2024 पासून अनिश्चित काळासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यात 900 वाहतूकदारांचा समावेश आहे. याबरोबरच सातारा पेट्रोल डीलर असोसिएशननेही पुणे पीडीएच्या आंदोलनाला पाठिंबा दिले असून त्यांनीही आंदोलनात सहभागी होण्याचा आणि 15 ऑक्टोबरपासून त्यांचे टँकर लोडिंगसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
तेल कंपन्यांशी अनुचित निविदा पद्धती आणि इंधन वाहतुकीतील मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोरीसंबंधीचे निराकरण न झालेल्या समस्यांमुळे ते त्यांचे टँकर टर्मिनलवर लोड करण्यासाठी पाठवणार नसल्याचे सांगितले आहे. तेल कंपन्या आणि अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही दुर्लक्षित करण्यात आलेल्या अनेक गंभीर समस्यांचे निराकरण करणे, हा या आंदोलनाचा उद्देश असल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितले आहे.
संघटनेने पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि तेल कंपन्यांना या नियोजित आंदोलनाबाबत आधीच माहिती दिली आहे. सामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित पक्षांना याची जाणीव असल्याची खातरजमा केली आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून पेट्रोल- डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात, गुणवत्तेत आणि वेळेवर पोहोचवणे ही तेल कंपन्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने सांगितले आहे.