31.1 C
New Delhi
Wednesday, March 12, 2025
Homeदेश-विदेशशेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा....

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा….

रविकांत तुपकर यांचा राज्य सरकारला घाम फोडणारा इशारा


‘क्रांतिकारी’च्या पहिल्याच राज्य कार्यकारणी बैठकीला दर्दी अन गर्दी

पुणे, प्रतिनिधी:- क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राची पहिली राज्य कार्यकारणी बैठक पुणे येथे सोमवारी (दि.3) मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शेतकऱ्यांची बुलंद तोफ असलेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला इशारा देत 18 मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा 19 मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा खणखणीत इशारा दिला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले तरी त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाशवी बहुमत मिळाल्याने मदमस्त बनलेले सत्ताधारी दारून पराभवाच्या धक्क्याने खंगून गेलेले विरोधक राज्याची अवस्था आहे. शेतकरी संघटनांची चळवळ शिथिल झालेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दैनावस्था झाली असून त्यांना वारीस उरलेला नाही. या साऱ्या परिस्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आश्वासक चेहरा असलेल्या रविकांत तुपकर यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे. शेतकरी चळवळीतील आक्रमक तेवढाच विश्वासू चेहरा अशी तुपकर यांची ओळख असल्याने त्यांच्या एका हाकेवर क्रांतिकारी संघटनेच्या पहिल्या राज्य कार्यकारिणी बैठकीला सोमवारी (दि.03) पुणे येथे शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुणे येथे आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारावर तुफान हल्ला चढवला. उत्पादन खर्च एवढाही भाव नसल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात येऊन ठेपला आहे असे सांगत राज्यात 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन झालेले असताना सरकारने केवळ 12 ते 15 लाख मॅट्रिक टन एवढ्याच सोयाबीनची खरेदी केली आहे. ती खरेदी करताना उत्पादन खर्च एवढाही भाव दिला नाही. कापूस पिकाची हीच अवस्था आहे. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी असून दुधाला दर नाही. सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. एवढा विसराळूपणा सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना क्रांतिकारी शेतकरी संघटना हे केवळ संघटन नसून राज्यभरातील करोडो शेतकऱ्यांची वज्रमूठ असणार आहे. आपल्या सर्वांना मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा नैतिक लढा लढायचा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य पिंजून काढायचे आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत जो कोणी अन्याय करील त्याला अद्दल घडवण्यासाठी मागेपुढे पाहू नका, असे सांगून क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणार तर आहेच परंतु शेती, माती आणि मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या घामाला योग्य मोबदला मिळवून द्यायचा आहे. शेतकऱ्यांसाठी राज्यभर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीरे घ्यायची आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना चळवळीशी जोडायचे आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल मुंबईसारख्या मोठ्या बाजारात थेट शेतकऱ्यामार्फत विकायचा आहे. यासाठी कामाला लागा असे आवाहन तुपकर यांनी संघटनेच्या राज्यभरातील नवीन पदाधिकाऱ्यांना केले.
दरम्यान, राज्याकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेची सत्वपरीक्षा न पाहता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करावी. सध्या अधिवेशन सुरू असून 18 मार्चपर्यंत कर्जमाफी न दिल्यास आरपारची लढाई लढणार आहे. 18 मार्चपर्यंत सरकारला वेळ देत आहोत. या कालावधीपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास 19 मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब फोडू असा गंभीर इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी गाड्या भरून 18 मार्च रोजी मुंबईकडे निघून 19 मार्च रोजी मुंबईत धडक देतील असे रविकांत तुपकर म्हणाले. यांनी परंतु त्यांनी कोणते आंदोलन करणार आणि मुंबईत नेमके कुठे करणार याबाबत काहीच सांगितले नाही. यामुळे 19 मार्चला रविकांत तुपकर आणि त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना मुंबईत नेमका कोणता धमाका करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.यशवंत गोसावी, गजानन अहमदाबादकर, राजकुमार कसबे, राजाभाऊ देशमुख, अंबादास कोरडे, लक्ष्मण मोरे, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, चंद्रशेखर गवळी, भगवान शिंदे, सत्तार पटेल, ज्ञानेश्वर टाले, नारायण लोखंडे यांच्यासह राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


रविकांतभाऊ शेतकरी चळवळीचा
आश्वासक चेहरा: प्रा.यशवंत गोसावी


प्रख्यात व्याख्याते तथा शेतकरी चळवळीतील नेते प्रा.यशवंत गोसावी यांनी तुफान शैली अन पहाडी आवाजात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रविकांत तुपकर हे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचा श्वासक चेहरा आहेत. तेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतात. शेतकऱ्यांचा आवाज बनून शासन आणि प्रशासनाशी भांडू शकतात. रवींकांतभाऊंचा आवाज बुलंद करण्यासाठी, तळागाळातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून सदैव सोबत असल्याचे यशवंत गोसावी यांनी सांगितले. ते नांदेड जिल्ह्यातील शेतकरी पिता- पुत्राच्या आत्महत्येचा प्रसंग सांगत असताना खचाखच भरलेल्या सभागृहातील शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.

  
*जेष्ठ कार्यकर्त्याने रविकांत तुपकरांसाठी* 
*खमिसाच्या खिशात आणली चटणी भाकरी* 

     क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पहिल्या राज्य कार्यकारणी बैठकीत राज्यभरातून ज्येष्ठ तसेच तरुण शिलेदार मोठ्या संख्येने आले होते. नगर येथील जेष्ठ कार्यकर्ते अंबादास कोरडे यांनी खास रविकांत तुपकर यांच्यासाठी प्रेमाने खमिसाच्या खिशात ठेचा भाकरीची शिदोरी आणली. कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावरच त्यांनी खिशातून भाकरीची छोटीशी पिशवी काढत रविकांत तुपकर यांच्या हाती दिली. यावेळी तुपकर गहिवरून गेले होते. त्यांनी आपल्या भाषणात गेल्या वीस वर्षापासून जिथे कुठे कार्यक्रम अथवा आंदोलन, मोर्चा असेल त्यावेळी 80 वर्षीय अंबादास कोरडे घरून निघताना माझ्यासाठी न विसरता घरून भाकरी बांधून आणतात, असे सांगितले. या प्रसंगातून शेतकरी चळवळीतील तरुणच नव्हे तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास असल्याचे दिसून आले. 
  

“किसान आर्मी”ची घोषणा

क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जशी इंग्रजांच्या काळात पत्री सरकारची स्थापना केली होती त्याच धर्तीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून “किसान आर्मी” तयार करणार असल्याची घोषणा यावेळी रविकांत तुपकर यांनी केली. ही किसान आर्मी ठोका ठोकीचे काम करणार आहे. शेतकऱ्यांची सक्तीची वसूली करणारे बँक अधिकारी, शेतकऱ्यांची वीज तोडणारे, शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करणारांना तसेच गुंड, मुजोर नेते यांना झॊडपून काढण्यासाठी किसान आर्मी ची टीम गावागावात काम करेल असे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
29 %
5.1kmh
40 %
Wed
35 °
Thu
36 °
Fri
33 °
Sat
33 °
Sun
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!