पुणे – राज्य सरकारने मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करावं आणि पूर्ण ताकदीनिशी हे विधेयक केंद्र सरकारला पाठवावं. आम्ही महाराष्ट्रातील सर्व खासदार हे विधेयक पूर्ण ताकदीनिशी केंद्राकडून मंजूर करून घेऊ. तशी जबाबदारी आम्ही घेतो. पण त्यासाठी राज्य सरकारने ठाम भूमिका घेणं महत्त्वाचं आहे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.आरक्षणामुळे मतांची विभागणी होईल का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर आरक्षणामुळे मतांची विभागणी होईल. महाविकास आघाडीबरोबरच महायुतीची मतेही कमी होणरा आहे. पण आम्ही मत किंवा कॅलक्युलेशनसाठी काही करत नाही. आम्ही फसवण्यासाठी आलेलो नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे बच्चू कडू महाविकास आघाडीत येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. पण त्यावर थेट भाष्य केलं नाही. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी जनतेचे सेवा करणारे आहोत. समाजात चांगले बदल घडावा म्हणून आम्ही प्रयत्न करतो. बच्चू भाऊंनी गेले अनेक वर्ष चांगलं काम करत समाजातील लोकांना मदत केलेली आहे. आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी काम करतो, बच्चू कडू हे महत्त्वाचे नेते आहेत. आमच्यात राजकीय मतभेद असतात आणि ते असलेच पाहिजे. परंतु त्यांनी नेहमी समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी चांगलं काम करून महाराष्ट्रातील एका दुर्लक्षित प्रश्नाला वाचा फोडलेली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज चांगला जोरदारपणे मांडू शकतात. ते तुमच्या सोबत आले तर महाविकास आघाडीचे हात अधिक बळकट होणार नाही का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी गोलगोल उत्तरं दिली. आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा, देशाची सेवा करण्यासाठी कामाला लागलेला आहोत. बच्चुभाऊ महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी अपंग, दिव्यांगांसाठी खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे. ज्या समाजाकडे कोणाचं लक्ष नव्हतं, अशा समाजाला प्रवाहात आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या लोकांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. राज्याचं प्रशासन बळकट करण्यासाठी सर्व चांगल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.