पुणे : सातारा जिल्ह्यातील करंदोशी गावाचे तेजस लहुराज मानकर (वय २२) हे जवान पंजाब भटिंडा कॅम्पमध्ये सेवा बजावत असताना डोक्यात गोळी लागून हुतात्मा झाले. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी गुरूवार पेठेतील प्रभात जन प्रतिष्ठानच्यावतीने ‘प्रभात शौर्य पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे वडील लहुराज मानकर, आई मनिषा मानकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सोहळ्याचे आयोजन श्री मुरलीधर मंदिर देवालय ट्रस्ट येथे करण्यात आले. यावेळी प्रभात जनप्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, उत्सव प्रमुख विजय चौधरी, शिवराज बलकवडे, राजेश नाईक, हेमराज साळुंके, अमोल थोरात, ओंकार नाईक उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जवान तेजस यांचे वडील सैन्यदलात मेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ सैन्यदलात कर्नल पदावर कार्यरत आहे. तसेच चुलते शशिकांत मानकर हे सुद्धा सैन्य दलात सेवा बजावत आहेत. सैन्य दलातून देशसेवा करण्याची परंपरा मानकर कुटुंबात आहे. दोन वर्षापूर्वी तेजस सैन्य दलात दाखल झाले होते. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्याची पंजाब भटिंडा येथे नियुक्ती करण्यात आली होती.
पद्मश्री डाॅ. उज्ज्वल निकम म्हणाले, आज आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात हे भारत देशाचे वैशिष्ट्य आहे. देशाच्या बाहेर भारतीय हीच ओळख आपण सांगतो. हा भारतीयपणाचा ठसा नेहमीच आपण मनामध्ये बिंबवला पाहिजे. जाती-धर्मावरुन भेद असतील परंतु देशाबद्दल नेहमी आदराची भावना पाहिजे.
ते पुढे म्हणाले, मनाची श्रीमंती तरुणांसमोर ठेवली पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय याचे पृत्थकरण करण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे. मनामध्ये काहीतरी चांगले करण्याची जिद्द पाहिजे. चांगल्या कामातून आपला दबदबा निर्माण करा. कामाला देव माना, असेही त्यांनी सांगितले.
लहुराज मानकर म्हणाले, सैनिकांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रभात जनप्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमातून तरुण प्रेरणा घेतील आणि देशासाठी सैनिक निर्माण होतील.
किशोर चव्हाण म्हणाले, सैनिक देशाच्या सिमेवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लढत असतो. त्यामुळे देशातील प्रत्येकाने त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ असले पाहिजे. देशासाठी शहिद झालेला सैनिक हा केवळ काही काळासाठी नव्हे तर चिरस्मरणात रहावेत आणि तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा, यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.