सोनं घ्यायचंय? पण थांबा… दर हवेत झेपावलेत!
पार १ लाखाकडे वाटचाल सुरू आहे.
मुंबई : मार्च, एप्रिल, मे या सणसमारंभांच्या हंगामात सोन्याच्या (gold)दरांनी अक्षरशः भरारी घेतली आहे. प्रत्येक जण सणात, लग्नसमारंभात उठून दिसण्यासाठी सोन्याचे दागिने परिधान करतो. मात्र आता दागिन्यांची ही हौस सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. सोन्याचा भाव दररोज नवे उच्चांक गाठत असून, लवकरच १ लाख रुपयांचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.
अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध, आर्थिक तणाव वाढल्यामुळे जागतिक आर्थिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षिततेच्या दृष्टीने सोन्याकडे वळत आहेत. परिणामी सोन्याच्या मागणीत वाढ होऊन दर भडकले आहेत.
दि. १६ एप्रिल रोजी सोन्याच्या(GoldRate) दराने ९७ हजार रुपये प्रति तोळा या पातळीला स्पर्श केला होता.
तर अवघ्या एका दिवसात, म्हणजेच दि. १७ एप्रिलला, दर आणखी वाढून ९८ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले आहेत.या वाढत्या दराचा थेट फटका सणासुदीतील खरेदीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तज्ज्ञांचे भाकीत:
गेल्या काही महिन्यांतील ट्रेंड पाहता, सोने दररोज सरासरी ५०० ते ८०० रुपयांनी वाढत आहे.
जागतिक तणाव कमी न झाल्यास आणि मागणीत अशीच वाढ कायम राहिल्यास, पुढील काही दिवसांत सोनं सहज १ लाख रुपयांचा टप्पा पार करेल, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.
सामान्य नागरिक हवालदिल:
सण, लग्नसमारंभाच्या काळात दागिने घालण्याची परंपरा असलेल्या भारतीय कुटुंबांना आता बजेटचे गणित पुन्हा मांडावे लागणार आहे. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता सोन्याच्या वाढत्या दराने आणखी चिंतेत टाकले आहे.
गुंतवणूकदारांसाठी संधी:
सोन्याच्या या वाढत्या दरामध्ये गुंतवणुकीची संधी दडलेली असली तरी सध्या कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. किंमतीचा आलेख बघता ‘मल्टी-यिअर हाय’ च्या दिशेने सोने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होत आहे.