भाजपच्या बहुप्रतीक्षित राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा अखेर अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत सध्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया १९ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, २० जानेवारी २०२६ रोजी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
नितीन नबीन प्रमुख दावेदार
सध्या भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असलेले नितीन नबीन हेच या पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवार उभा राहण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने, त्यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नामांकन प्रक्रियेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे प्रस्तावक म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषदेचे सदस्य यांना दिल्ली येथे पाचारण करण्यात आले आहे. ही प्रक्रिया केवळ औपचारिक नसून, पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष?
४६ वर्षीय नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यास ते भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरतील. जे. पी. नड्डा यांच्या दीर्घ कार्यकाळानंतर होणारा हा बदल पक्षात नव्या नेतृत्वाचा आणि नव्या रणनीतीचा संकेत मानला जात आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितीन नबीन यांनी संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. बूथ पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केल्याचं सांगितलं जातं. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी ही त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.


