28 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमनोरंजनगुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील ‘तुझे आहे तुजपाशी’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर

पुणे- प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25 वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला.

मराठी माणसाचे प्रेम आणि आदर प्राप्त असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे नाटक दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी नव्या संचात रंगमंचावर आणले आहे. या नाटकातील काकाजी ही मध्यवर्ती भूमिका नाटक, सिनेमा आणि मालिका या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक यांनी साकारली आहे.

विजय पटवर्धन हे नाटकाचे दिग्दर्शक असून सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉ प्रचिती सुरू- कुलकर्णी, रूपाली पाथरे,मुक्ता पटवर्धन,वसंत भडके,दिपक दंडवते,मंदार पाठक,मनोज देशपांडे,मेधा पाठक,आशा तारे यांनी देखील या नाटकात भूमिका साकारल्या आहेत.नाटकाचे सूत्रधार भैरवनाथ शेरखाने आणि नाटकाचे व्यवस्थापक राजेंद्र बंग हे आहेत.

विविध संचात या नाटकात तीन भूमिका करण्याची संधी मिळालेले आणि सध्या या नाटकातील काकाजींची भूमिका करणारे डॉ. गिरीश ओक या नाटकाबद्दल बोलताना म्हणाले की, या नाटकातील संदर्भ जुने आहेत. वातावरण जुन्या काळातील आहे. तरीदेखील हे नाटक तब्बल तीन पिढ्यांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे हे नाटक अजरामर ठरले आहे.

जुने नाटक नव्या संचात सादर करताना आनंद तर मिळतोच. मात्र, ते आव्हानात्मकही आहे. विशेषत: जुन्या नाटकाचे सादरीकरण आणि जुन्या नाटकातील भूमिका सादर करणारे अभिनेते यांच्याशी तुलना होते. अनेक वेळा ती त्रासदायक ठरते, असेही डॉ ओक यांनी नमूद केले.

‘तो मी नव्हेच,’ ‘ती फुलराणी’ आणि आता ‘तुझे आहे तुजपाशी’ अशा तीन नाटकांमध्ये नव्या संचात भूमिका करण्याची संधी मला मिळाली. ‘तो मी नव्हेच’च्या दोनशे प्रयोगांपैकी पहिल्या पंचवीस प्रयोगात माझ्या कामाची जुन्या अभिनेत्यांबरोबर तुलना झाली. ‘ती फुलराणी’ हे नाटक तर अनेक वेळेला अनेक अभिनेत्यांनी केले असल्यामुळे या नाटकातील भूमिकेची सतत तुलनाच होत राहिली.

मात्र, ‘तुझे आहे तुजपाशी’ करताना हा त्रास फारसा जाणवला नाही. या नाटकाशी मी दीर्घकाळ संबंधित राहिलो आहे. महाविद्यालयात असताना या नाटकात मी श्यामची भूमिका साकारली. त्यानंतर दीर्घकाळ डॉ सतीश ही भूमिका केली आणि आता 25 प्रयोग काकाजींची भूमिका करत आहे. एकाच नाटकात तीन भूमिका करण्याची संधी एकाच अभिनेत्याला तेव्हाच मिळू शकते, जेव्हा त्या नाटकामुळे प्रदीर्घ काळ चालण्याची क्षमता असते, असेही डॉ. ओक म्हणाले.

‘तुझे आहे तुजपाशी’च्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी या नाटकाचे तोंड भरून कौतुक केले. या नाटकाचे लेखन अप्रतिम असून कलाकार ते उत्तमपणे सादर करत असल्याचे सांगून जोशी यांनी आतापर्यंत हे नाटक बघण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28 ° C
28 °
28 °
34 %
2.2kmh
0 %
Fri
28 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!