32.1 C
New Delhi
Saturday, April 19, 2025
Homeमनोरंजनगुरुंप्रती शिष्य झाले स्वरलीन..!

गुरुंप्रती शिष्य झाले स्वरलीन..!

पंडित सी. आर. व्यास शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त रंगली स्वरमैफल



पुणे : ‌‘काहो मोसे रुठ गये मोरे गुणवंता‌’, ‌‘मितवा कित जाए रे‌’, ‌‘सोहत गले माल सिस मुकुट केसर तिलक‌’, ‌‘सुघर न्यार खरी‌’,‌‘पपिहा पुकारे पि पिया‌’, ‌‘सरस सूर गाऊ मन रिझाऊ‌’, ‌‘देख चंदा नभ निकस आयो‌’, ‌‘चरण तोरे बिनती मोरी‌’ या व्यासबुवा यांनी रचलेल्या रचनांची गोडी त्यांच्या शिष्यांकडून अनुभवायला मिळाली.
पंडित सी. आर. व्यास उर्फ ‌‘गुणिजान‌’ शिष्य परिवारातर्फे रविवारी व्यासबुवांच्या जन्मशताब्दी वर्षातील गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी रसिकांना व्यासबुवांनी रचलेल्या रचनांचा तसेच काही पारंपरिक रचनांचा आनंद घेता आला. कार्यक्रम बी. एम. सी. सी.मधील विश्वदर्शन थिएटर स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ गायक-अभिनेत्री निर्मला गोगटे, मधुवंती दांडेकर, शैला मुकुंद, रागा नेक्स्टचे अरुण जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य पंडित सुहास व्यास, पंडित श्रीराम शिंत्रे, अपर्णा केळकर, श्याम गुंडावार, ज्ञानराज औसेकर, मेघना घेरकर, केदार केळकर, ऋतुजा वाणी, नीरज गोडसे, आनंद बेंद्रे यांनी गायन सेवा रुजू केली. अमेय बिच्चू, निलय साळवी, प्रणव गुरव, कौशिक केळकर, स्वानंद केळकर, गार्गी काळे यांनी साथसंगत केली.
कैशिक रंजनी, मारुबिहाग, ओडव बागेश्री, धनकोनी कल्याण, भिमपलास, जोगिया, देसी, भूपाली तोडी, बिलासखानी तोडी, जौनपुरी, गौडसारंग आदी रागांमधील रचना या वेळी सादर करण्यात आल्या. गुरूंची महती सांगणाऱ्या ‌‘तोरे गुण गाऊ‌’, ‌‘गुरुबिन ग्यान प्राण बिन तन समान‌’, ‌‘त्यज रे मन‌’, ‌‘तोरे दरबार आज सब दास गुनिजन‌’, ‌‘काहो मोसे रुठ गये मोरे गुणवंता‌’ या रचना रसिकांना विशेष भावल्या.
पंडित सी. आर. व्यास यांच्या 50 वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या गुरुपौर्णिमा उत्सवात निर्मला गोगटे यांनी राग स्वानंदी सादर करून रसिकांना मोहित केल्याची आठवण पंडित सुहास व्यास यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

गुरूंचा वारसा व्यास कुटुंबियांनी कायम राखला : निर्मला गोगटे

पंडित सी. आर. व्यास आणि कुटुंबियांविषयीच्या आठवणींना उजाळा देऊन निर्मला गोगटे म्हणाल्या, व्यासबुवा यांची तीनही मुले त्यांच्याप्रमाणेच संगीतामध्ये रमलेली आहेत याचा मला खूप आनंद आहे. शब्दाला अर्थ, सूराला भाव आणि त्यातून निर्माण होणारी उत्कटता, समर्पित भाव या बाबतीत पंडित सी. आर. व्यास यांचे गुरू जगन्नाथबुवा श्रेष्ठ होते. हा समर्पित भावाचा वारसा व्यास कुटुंबियांनी पुढे सुरू ठेवला आहे. स्वरांच्या चरणी लीन होण्याची आवश्यकता आहे त्यातूनच संगीताची महानता कळते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.1 ° C
32.1 °
32.1 °
37 %
4.3kmh
0 %
Sat
41 °
Sun
41 °
Mon
40 °
Tue
41 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!