पुणे : समाजात अनेकजण आपला संघर्ष घेऊन आयुष्याची वाटचाल करीत असतात. या जगण्याच्या संघर्षाला ईश्वरीय अधिष्ठान दिले तर संघर्ष सुसह्य होतो, हेच समाजशास्त्र आहे. जिवनात आपल्या वाट्याला संघर्ष येणारच आहे, अशावेळी तुम्ही किती स्थितप्रज्ञ राहता हे महत्त्वाचे आहे. उत्कृष्ट होणाच्या मागे लागू नका तर समाजामध्ये उत्तम होणाचा प्रयत्न करा. कोणाचाही मत्सर करु नका, असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे समाजशास्त्र या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, आपल्या मनामध्ये जी विकृती निर्माण होते, ती विकृती घालवण्यासाठी समाजशास्त्राची गरज आहे. मनामध्ये ज्यावेळी भेदाचा भ्रम निर्माण होतो, त्यावेळी आपण समाजापासून आणि स्वत्वापासून लांब जातो. परंतु जो माणूस मी कोण आहे हे समजून घेतो, तो समाजाला स्वतःचा भाग समजतो.
पाश्चात्य देशात ज्ञानोबा-तुकोबा आपलेसे वाटतात, परंतु आपल्याकडे ते कालबाह्य वाटतात. सामाजिकदृष्ट्या जर अधःपतन नको असेल, तर ज्ञानोबा-तुकोबा यांचे समाजशास्त्र समजून घ्यावे लागेल. आपण वेदांच्या भिंती उभ्या करुन त्यावर उभे राहून आरडाओरडा करतोय परंतु या जगाच्या प्रती भावना, संवेदना, कर्तव्य काय आहे हे समजून घ्यायला हवे.
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.