‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील तरुणाईला भुरळ घालणारे गाणे प्रदर्शित
अभिषेक मेरूकर दिग्दर्शित ‘लाईक आणि सबस्क्राईब’च्या रहस्यमयी टिझरने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली असून सोशल मीडियावर कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील तरुणाईला आवडेल असे भन्नाट गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. ‘अपलोड करून टाक’ असे या गाण्याचे बोल आहेत. अनेक जण कॅमेराच्या साहाय्याने जीवनातील प्रत्येक आनंददायी क्षण टिपण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवतात. तरुणाईच्या आयुष्यात अपलोड करणे, ही दिनचर्या झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधील हे गाणे तरुणाईला विशेष रिलेट होणारे आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर कस्तुरी वावरे यांनी यांच्या मधुर आवाजात हे गाणे गायले आहे.
‘अपलोड करून टाक’ गाण्यात जुई भागवत आयुषयातील प्रत्येक क्षणाचा व्लॅाग बनवून तो सोशल मीडियावर अपलोड करताना दिसत आहे. या गाण्यातील प्रत्येक ओळ आजच्या तरुणाईच्या आयुष्याशी जोडलेली आहे. त्यामुळे हे गाणे त्यांना अधिक जवळचे वाटेल. लाईक, सबस्क्राईब, व्लॅाग या शब्दांभोवती फिरणारी ही गोष्ट प्रेक्षकांना १८ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे. अभिषेक मेरूकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची निर्मिती नितीन वैद्य प्रॉडक्शन्स, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी, अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांनी केली आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
या गाण्याबद्दल दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात, “मुळात या चित्रपटाची कथा आताच्या वापरातील लाईक, शेअर, सबस्क्राईब या शब्दांभोवती फिरणारी आहे. ही कथा तरुणाईच्या जवळची असली तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा आहे. आजच्या पिढीला आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर सगळ्यांसोबत शेअर करण्याची एक सवय लागली आहे आणि हेच या गाण्यातून दिसत आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ मधील हे गाणे आजच्या पिढीला नक्कीच आवडेल.”