24.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमनोरंजनपहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात रंगणार शुक्रवारपासून

पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात रंगणार शुक्रवारपासून

प्रतिभा मतकरी यांचा ‌‘बालरंगभूमी गौरव पुरस्कार‌’ देवून होणार सन्मान

पुणे : कलांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा, या दृष्टीने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे दि. 20 ते दि. 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात पहिले बालरंगभूमी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील बालकलावंत तसेच दिव्यांग बालकलावंतांना सादरीकरणासाठी संधी देण्याचा बालरंगभूमी संमेलनाचा प्रयोगही प्रथमच होत आहे. बालनाटकांबरोबरच जादूचे प्रयोग, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ होणार असून हे संमेलन बालकलाकारांसह शालेय विद्यार्थ्यांना पर्वणी ठरणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के-सामंत यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुण्यातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक, बिबबेवाडी येथे या तीन दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनासाठी सर्वांना मुक्त प्रवेश असणार आहे.
संमेलनाची सुरुवात दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता बालनाट्यांच्या सादरीकरणाने होणार आहे. महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये गाजत असलेली म्हावरा गावलाय गो (नाट्यरंग, जळगाव), विंडो 98 (मोहिनीदेवी रुंगठा शिक्षण मंडळ, नाशिक), दहा वजा एक (दामले विद्यालय, रत्नागिरी), फुलपाखरू (नाट्य आराधना, अहिल्यानगर) ही बालनाट्ये सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळात सादर होणार आहेत. दुपारी 1 वाजता प्रख्यात चित्रकार अरुण दाभोळकर व ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या विशेष उपस्थितीत कलादालनाचे उद्घाटन होणार आहे. या कलादालनात बालकलाकारांनी साकारलेली चित्र, शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या कलादालनात जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌‍तर्फे तसेच महाराष्ट्रातील विविध तज्ज्ञांची कला, हस्तकला, व्यंगचित्र, चित्रकला याविषयी विनामूल्य कार्यशाळा होणार आहेत.
चित्ररथांसह शोभायात्रा
दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बालकलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून शोभायात्रेला शिळीमकर विद्यालयापासून सुरुवात होणार आहे. या शोभायात्रेचे वैशिष्टय म्हणजे यात मोठ्या चित्ररथांसह, हरियाणातून आलेल्या कलावंतांच्या भव्य मानवीकृती असणारे रामायणातील प्रतिकृती असणार आहेत. लेझीम, दिंडी यासह विविध ऐतिहासिक महापुरुषांची तसेच पारंपरिक व्ोशभूषा केलेले बालकलावंत या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता सुलभा देशपांडे मुक्तमंचाचे उद्घाटन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्या हस्ते होणार आहे. पद्मश्री परशुराम गंगावणे, रघुवीर विजय जादूगार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता सुधा करमरकर मुख्यमंच येथे रघुवीर विजय जादूगार यांचे जादूचे प्रयोग तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे.
मुख्य उद्घाटन सोहळा व बालकलावंतांचे कलादर्शन
दि. 21 डिसेंबरला सुधा करमरकर मुख्यमंचावर सोलापूर, मंगळवेढा, अहिल्यानगर, नंदूरबार, पंढरपूर, मुंबई, रत्नागिरी, पुणे, इचलकरंजी, लातूर, जळगाव, नाशिक येथील बालकलावंतांचा तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर दिव्यांग बालकलावांचे विविध कलादर्शन सादर होणार आहेत. सकाळी 10.30 वाजता सुधा करमरकर मुख्यमंचाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्यासह अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते सुबोध भावे, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माते अजित भुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
‌‘भविष्यातील बालरंगभूमी‌’ या विषयावर दुपारी 12 वाजता महाचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चेत नटवर्य मोहन जोशी, मोहन आगाशे, सुबोध भावे, ॲड. निलम शिर्के सामंत, राजीव तुलालवार यांचा सहभाग असणार आहे. या महाचर्चेचे सूत्रसंचालन अजित भुरे करणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 ते 5 सुधा करमरकर मुख्यमंचावर बालरंगभूमी परिषदेच्या शाखांतील बालकलावंतांचे गायन, वादन कलादर्शन होणार आहे. तर सुलभा देशपांडे मुक्तमंचावर दिव्यांग बालकलावंतांचे कार्यक्रम सादर होणार आहे. यानंतर सहभागी शाखांचा सन्मान सोहळा होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता व्यंगचित्रकारितेवर आधारित प्रख्यात व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांचा मनोरंजक कार्यक्रम होणार असून, सायंकाळी 6.30 वाजता वेशभूषा, रंगभूषा, संगीत, नृत्य यांचा विविधरंगी कार्यक्रम ‌‘दे धमाल‌’ होणार आहे. दुसऱ्या दिवशीचा समारोप रात्री 8 वाजता सुलभा देशपांडे मुक्तमंचावर शुभांगी दामले यांच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे निर्मित ‌‘चेरी एके चेरी‌’ या ग्रीप्स थिएटर बालनाट्याचा प्रयोग होणार आहे.
बालरंगभूमी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी (दि.22) रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळशत सुधा करमरकर मुख्यमंचावर सातारा, बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, परभणी, कोल्हापूर, अकोला, नागपूर, धुळे, जालना, ठाणे, पिंपरी-चिंचवड, पुणे येथील बालकलावंतांचे तर सुलभा देशपांडे मुक्त मंचावर दिव्यांग बालकलावंतांचे विविध कलादर्शन होणार आहे. दुपारी 12 ते 1 बालक, पालक आणि मान्यवरांचा परिसंवाद होणार असून, या परिसंवादाच्या सूत्रधार ज्येष्ठ अभिनेत्री निलम शिर्के-सामंत असणार आहेत. त्यानंतर विविध कलादर्शनानंतर सहभागी शाखांचा सन्मान सोहळा होणार आहे. याच दरम्यान सुलभा देशपांडे मुक्तमंचावर पद्मश्री उदयजी देशपांडे यांचे मल्लखांब खेळ व मार्गदर्शन दुपारी 12 वाजता तर दुपारी 2 वाजेपासून दिव्यांग बालकांचे कला सादरीकरण होणार आहे. दुपारी 4.30 वाजता बालप्रेक्षकांना गंमतीदार विषयांवर बोलतं करणारा मजेदार खेळ ‌‘चॅटर बॉक्स‌’ हा कार्यक्रम होणार आहे.
दिमाखदार पुरस्कार सोहळ्याने होणार समारोप
पहिल्या बालरंगभूमी संमेलनाच्या निमित्ताने बालरंगभूमीवर अविरत कार्य करणाऱ्या व महाराष्ट्रातील बालरंगभूमीचे कार्य वृध्दिंगत करणाऱ्या प्रतिभा मतकरी यांना ‌‘बालरंगभूमी गौरव पुरस्कार‌’ देवून गौरविण्यात येणार आहे. यासह पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, रामदास पाध्ये, सलील कुलकर्णी यांना विशेष सन्मानाने तर भार्गव जगताप, खुशी जारे, आरुष बेडेकर यांना विशेष बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याला अभिनेते सचिन पिळगावकर, संमेलनाध्यक्ष मोहन जोशी यांच्यासह गंगाराम गवाणकर, डॉ. निशिगंधा वाड, कुमार सोहवी, शैलेश दातार, ऋतुजा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सन्मान सोहळ्यादरम्यान सिने नाट्य बाल – युवा कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. यात माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा वायकूळ, लिटील चॅम्पस्‌‍ फेम बालगायिका स्वरा जोशी, अलबत्या गलबत्या फेम निलेश गोपनारायण, आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम माऊली व शौर्य घोरपडे आदी बालकलाकार सादरीकरण करणार असून याप्रसंगी त्यांनाही गौरविण्यात येणार आहे.
पुणेकर रसिकांसह बालगोपाळांनी या पहिल्या बालरंगभूमी संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
24.1 ° C
24.1 °
24.1 °
31 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!