पुणे : उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात बालनाट्य हंगामाला सुरुवात होणार असून, रंगभूमी पुन्हा एकदा बालनाटकांनी गजबजणार आहे. आजी-आजोबांच्या गोष्टींपासून ते जादुई दुनियेची सफर, मोबाईलच्या दुष्परिणामांपासून सुरक्षेपर्यंत विविध विषयांवर आधारित नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. येत्या १५ एप्रिलपासून बालरंगभूमीचा पडदा उघडणार असून, नव्या-जुन्या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत.
यासाठी नाट्यसंस्था आणि कलाकारांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. काही संस्थांनी तर स्वतंत्र बालनाट्य महोत्सव आयोजित करण्याचे नियोजनही केले आहे. मात्र, या उत्साहाला नाट्यगृहांच्या तारखांचा तुटवडा मोठे आव्हान ठरत आहे.
नाट्यनिर्माते आणि दिग्दर्शकांच्या मते, महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांच्या तारखाही सहज उपलब्ध होत नाहीत. आगाऊ बुकिंग करूनही तारखा मिळण्यात अडचणी येत असल्याने प्रयोगांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक संस्थांना पर्यायी जागांचा शोध घ्यावा लागत आहे.
मराठी रंगभूमीवर बालनाटकांची समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत शाळांना सुट्ट्या लागल्यानंतर बालनाट्यांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सादर केले जातात. यंदाही १५ एप्रिलनंतर या प्रयोगांना सुरुवात होणार असली, तरी नाट्यगृहांच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यासंदर्भात नाट्यनिर्माते-दिग्दर्शक संतोष माकुडे यांनी सांगितले की, “दरवर्षीप्रमाणे यंदाही नाट्यगृहांच्या तारखा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या नाट्यगृहांच्या तारखा मिळणे अवघड झाल्याने आम्हाला खासगी नाट्यगृहांकडे वळावे लागले.”
एकूणच, बालनाट्य हंगामाची रंगत वाढत असताना, नाट्यगृहांच्या तारखांचा तुटवडा हा प्रश्न नाट्यसंस्थांसमोर पुन्हा एकदा उभा ठाकला आहे.


