41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsअफवांचा परिणाम; इंधनासाठी पंपांवर नागरिकांची झुंबड

अफवांचा परिणाम; इंधनासाठी पंपांवर नागरिकांची झुंबड

पिंपरी : आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांनी उद्योगनगरीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेक ठिकाणी इंधनाचा साठाही संपत असल्याचे चित्र दिसत आहे.

शुक्रवारी (दि. २७) सकाळी आणि सायंकाळी पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांतील पेट्रोलपंपांवर नेहमीपेक्षा मोठी गर्दी पाहायला मिळाली. आकुर्डी येथील इंडस्ट्रियल सर्व्हिस स्टेशन पंपावर सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत ग्राहकांची मोठी वर्दळ होत असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.

अजिंठानगर परिसरातील अंबिका पेट्रोलियम पंपावर मागणी अचानक वाढल्याने गेल्या काही दिवसांत रात्रीच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेल संपत असल्याचे दिसून आले. गुरुवारी तर हा पंप पूर्ण दिवस बंद ठेवावा लागला होता. शुक्रवारी दुपारी टँकर आल्यानंतरच पुन्हा सेवा सुरू करण्यात आली.

लिंक रस्त्यावरील गावडे पेट्रोलियम आणि चिंचवड येथील जयहिंद सर्व्हिस स्टेशन येथेही सकाळ-सायंकाळच्या वेळेत ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे समोर आले आहे. विशेषतः सकाळी ९ नंतर आणि रात्री ८ नंतर येथे वाहनांच्या रांगा लागत आहेत.

खराळवाडी येथील एचपी ऑटो केअर पंपावर ग्राहकसंख्या सुमारे १० टक्क्यांनी वाढली असली, तरी येथे मोठ्या रांगा दिसून आल्या नाहीत. मोरवाडी परिसरातील पंपांवरही तुलनेने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते.

निगडीतील श्री बालाजी पेट्रोलियम पंपावर सकाळी ८ ते दुपारी १ आणि सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे संचालकांनी सांगितले. संभाजीनगर येथील एका पंपावर तर दुपारपर्यंतच इंधन साठा संपल्याने पंप बंद ठेवावा लागला.

दरम्यान, काही भागांमध्ये परिस्थिती तुलनेने शांत असून, टाटा मोटर्स परिसर आणि संत तुकारामनगर येथील काही पंपांवर गर्दी कमी असल्याचे चित्र आहे.

एकूणच, इंधन टंचाईबाबतच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, त्याचा थेट परिणाम इंधन विक्रीवर होत आहे. प्रशासनाकडून याबाबत स्पष्ट माहिती दिली जाण्याची गरज व्यक्त होत आहे, जेणेकरून अनावश्यक गर्दी आणि गैरसोय टाळता येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments